Join us  

हिरवळ दाटणार चोहीकडे, मुंबई देशी झाडांनी बहरणार; पालिकेकडून हजाराेंहून अधिक ठिकाणी झाडांचे रोपण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 1:56 PM

...यासाठी सध्या ही रोपे तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांचे रोपण केले जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. 

मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे मुंबईतून लुप्त होणाऱ्या अनेक देशी प्रजातींची झाडे मुंबईकरांना पुन्हा पाहावयास मिळणार आहेत. यासाठी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाद्वारे लवकरच या झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या सर्व विभागांतील विविध उद्यानांमध्ये तब्बल ११०० ठिकाणी या झाडांचे रोपण केले जाणार आहे. यात काही फळझाडे आहेत. यासाठी सध्या ही रोपे तयार करण्याचे काम सुरू असून, लवकरच त्यांचे रोपण केले जाणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात केंद्र सरकार आणि प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ याने झाला. या अभियानांतर्गत पालिकेतर्फे ९ ठिकाणी ‘अमृत - वाटिका’ साकारण्यात आल्या आहेत. प्रत्येकी एका अमृत - वाटिकेत ७५ देशी प्रजातीची झाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांना या दुर्मीळ झालेल्या झाडांच्या सावलीचाही आनंद घेता येणार आहे. 

कोणत्या झाडांच्या रोपांचा समावेश ? -  आवळा, बेल, शिकेकाई, पळस, अंजन, शेवर, रिठा, बेहडा, चिलार, करंज, खैर, शिशम, आपटा, चंदन, रक्तचंदन, काटे बाभळ, बकुळ, कण्हेर, हिरडा, महोगणी, शेवर, सागरगोटा, कवठ, भोकर, शमी, वड आदी देशी झाडांची रोपे सध्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यानात तयार करण्यात येत आहेत. -  सध्या या झाडांच्या बियांपासून रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर १,१०० ठिकाणी ही झाडे लावण्यात येणार आहेत.-  त्यामुळे लवकरच मुंबईकरांना आपल्या अवतीभवती ही दुर्मीळ झाडे बहरलेली दिसतील.

हरित मुंबईसाठी पालिकेचा प्रयत्न मुंबई महानगर जसजसे वाढत जात आहे, तसतसे या महानगरातील अनेक देशी - प्रजातींची झाडे दिसेनाशी होत आहेत. पर्यावरणाचे संतुलन टिकवून ठेवण्यासाठी आणि मुंबई सतत हरित राहावी, मुंबईकरांना स्वच्छ हवा मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिका