बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 05:59 AM2018-12-07T05:59:03+5:302018-12-07T05:59:11+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक गुरुवारी दादरला एकवटले होते.

To greet Babasaheb, Lotus Bhimasagar on Chaityabhoomi | बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लोटला भीमसागर

Next

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीमसैनिक गुरुवारी दादरला एकवटले होते. या वेळी अनुयायींनी बाबासाहेबांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
समता सैनिक आणि मुंबई पोलिसांच्या अचूक नियोजनानंतरही लाखोंच्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी दाखल झाल्याने दर्शनासाठीची रांग चैत्यूभीपासून दूरपर्यंत गेली होती. मोठ्या संख्येने आलेल्या अनुयायींना सेवा-सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेने चोख व्यवस्था केल्याचे पाहायला मिळाले. बहुतेक सामाजिक संस्था आणि संघटनांकडून बाबासाहेबांच्या विचारांबाबत जनजागृती करण्यात येत होती. समता कला मंच व कबीर कला मंचतर्फे सुमारे ४० कलाकारांच्या पथकाने एल्गार परिषदेअंतर्गत ताब्यात घेण्यात आलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. तर ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांच्या चमूने शिवाजी पार्क मैदानावर सादर केलेल्या गीतांनी भीमसैनिकांचे मनोरंजनासह प्रबोधनही केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अशा अनेक राजकीय नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. महत्त्वाची बाब म्हणजे शिवाजी पार्क मैदानात लहानसहान हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणेने ड्रोनची मदत घेतली होती.
अनुयायींना चैत्यभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी येथे एअर बलून लावण्यात आला होता. अनेकांना चैत्यभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी या एअर बलूनची मदत झाली. विविध पक्ष आणि संघटनांनी उभारलेल्या मदत कक्षासह वैद्यकीय कक्ष, भोजनदान कक्ष आणि पाणीवाटपामुळे अनुयायींना दिलासा मिळाला. शांततेत व शिस्तबद्धपणे अनुयायींना चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केले.
चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर राजगृहाला भेट देत बहुसंख्य अनुयायींनी शिवाजी पार्कवरील साहित्य ठेवलेल्या स्टॉलला भेट दिली. या स्टॉल्सवर बाबासाहेबांची पुस्तके, मूर्ती अशा प्रकारे प्रबोधन करणाऱ्या तसेच बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देणाºया साहित्याची खरेदी केली.
>बौद्ध भिक्खूंमुळे वातावरण बदलले
चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर दमलेले अनुयायी विश्रांतीसाठी शिवाजी पार्कच्या दिशेने कूच करत होते. मात्र दुपारच्या सुमारास या ठिकाणी उपस्थित झालेल्या बौद्ध भिक्खूंच्या चमूने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. दमलेल्या आणि थकलेल्या चेहºयांवर भिक्खूंच्या आगमनानंतर अनोखी ऊर्जा पाहायला मिळत होती. भिक्खूंचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वच अनुयायींनी गर्दी केली.

Web Title: To greet Babasaheb, Lotus Bhimasagar on Chaityabhoomi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.