लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग संवर्धन विभागाने २६ ते २८ मे दरम्यान माहुली किल्ल्यावर दुर्ग संवर्धन मोहिमेचे आयोजन केले आहे. माहुली किल्ल्यावर अपघाती मृत्यू पावलेल्या ज्येष्ठ गिर्यारोहक विवेक वेरूळकर यांना अभिवादन करण्यासाठी ही विशेष मोहीम राबवणार असल्याचे दुर्ग संवर्धन विभागाचे अध्यक्ष गणेश रघुवीर यांनी सांगितले.रघुवीर म्हणाले की, ३१ मे १९९७ रोजी माहुलीवर भंडारदुर्ग येथील कल्याण दरवाजा खाली उतरत असताना वेरूळकर यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी घटनेला यंदा २० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने वेरूळकर यांना मानवंदना देण्यासाठी प्रतिष्ठानने दुर्ग संवर्धनासह स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेअंतर्गत २६ मे रोजी रात्री ९ वाजता किल्ला चढण्यास सुरुवात होईल. २७ मे रोजी सकाळी ९ वाजता भंडारदुर्ग येथील कल्याण दरवाजा येथे श्रद्धांजली कार्यक्रम होईल. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे सदस्य आणि माहुली किल्ल्याचे मार्गदर्शक गियार्रोहक विलास वैद्य हे गिर्यारोहकांना ट्रेकिंग क्षेत्रातील माहिती देतील. दुपारी १२ ते ३.३० वाजेदरम्यान स्वच्छता मोहीम पार पडेल. स्वच्छता मोहिमेनंतर इच्छुक सदस्यांना घरी जाता येईल. मात्र प्रतिष्ठानने रात्रीच्या वेळेस किल्ल्यावर रमेश शिर्के व अजिंक्य हरड यांच्या नेतृत्वाखाली इतिहासातील विविध घटनांवर चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्रात सर्व सदस्यांना चर्चा करण्याची संधी दिली जाईल. २८ मे रोजी सकाळी ७ ते १२ वाजेदरम्यान पुन्हा एकदा स्वछता मोहीम केली जाईल. दुपारी १ वाजता जेवण करून गड उतरण्यास सुरुवात होईल.
दुर्ग संवर्धनातून दिवंगत गिर्यारोहकाला अभिवादन
By admin | Published: May 15, 2017 12:52 AM