- टीम लोकमत, मुंबई
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त देशभरातून दादर येथील चैत्यभूमी येथे दाखल झालेल्या अनुयायांनी गुरुवारी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन केले. त्याचवेळी शहरासह उपनगरात डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चर्चासत्रे, मिरवणुका, रॅली, फेऱ्या आणि परिसंवादांचे आयोजनही करण्यात आले. वर्षभरात होऊ घातलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ध्यानात घेत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनीही जयंतीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात पुढाकार घेतल्याचे चित्र पहावयास मिळत होते. दादर परिसरात भीमसैनिकांची गर्दी उसळली होती. त्यामुळे पोलिसांनी या परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून वाहतुकीचे नियोजन केले होते. यात महाविद्यालयीन विद्यार्थीही सहभागी झाले होते. ‘पुस्तके निघाली वस्तीकडे’डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीनिमित्त ‘ग्रंथाली’ने बाबासाहेबांच्या साहित्यासह आंबेडकरी विचारांच्या १२५ पुस्तकांचा संच वाचकांसाठी उपलब्ध केला आहे. आंबेडकरी साहित्याचे हे किमान १ हजार २५० संच वाड्या-वस्त्यांतील वाचकांना पोहोचविण्याचा निर्धार केला आहे. यातून तरुणांना आंबेडकरी विचारांची प्रेरणा मिळावी, हा हेतू आहे. उपक्रमात सहभागी होण्यासाठी ‘ग्रंथाली’, द्वारा वुलन मिल म्युनिसिपल स्कूल, खोली. क्र. ९, तळमजला, जे. के. सावंत मार्ग, यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिराशेजारी, माटुंगा, येथे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.एरव्ही केवळ डॉ.आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दादरच्या चैत्यभूमीची वाट धरणाऱ्या दलित बांधवांनी आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचे निमित्त बुधवारी सकाळपासून दादरकडे वाटचाल सुरू केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले अनुयायी महामानवाच्या चरणी नतमस्तक झाले. सकाळपासून भीमसैनिकांची गर्दी चैत्यभूमीवर दिसत होती. पांढरे शुभ्र वस्त्र व निळा फेटा असा पेहराव परिधान करून, हजारो अनुयायांनीबाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ढोल, ताशे, मृदंग यांच्या गजरात मिरवणूकाही निघाल्या.दादर परिसरात शुभ्र वस्त्रे परिधान केलेले आंबेडकर अनुयायी ‘जय भीम’चा उद्घोष करत मार्गक्रमण करीत होते. त्यामुळे दादर रेल्वे स्थानक व आजूबाजूचा परिसर उजळून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांनी शिवाजी पार्कवर तळ ठोकला होता. शिवाजी पार्कवर पुस्तकांचे स्टॉल्स, ध्वनी-चित्रफिती विकणाऱ्यांचे स्टॉल्स, अनेक संस्था, संघटना व सेवाभावी संस्थांकडून भोजनदान, आरोग्य शिबिर, जनजागृती शिबिर राबविण्यात आले. बौद्धेत्तर समाजाची रॅलीधारावीत प्रथमच बौद्धेतर समाजातील लोकांनी पुढाकार घेऊन बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त गुरुवारी प्रबोधन रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीत धारावीतील संत कक्कया विकास संस्था संचालित श्रीगणेश विद्या मंदिर, आंध्र-कर्नाटक दलित वर्ग संघ संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कामराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बीएसआयएस हायस्कूल व प्रेरणा तनिष्का व्यासपीठ इत्यादी संस्थांमधील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले. ‘राजगृह’ पाहण्यासाठी अनुयायांची गर्दीवरळीतील बीडीडी चाळ क्रमांक ९७ समोरील पटांगणातील ‘राजगृहा’ची प्रतिकृती पाहण्यासाठी आंबेडकर अनुयायांनी एकच गर्दी केली. ग्रंथप्रेमाचे प्रतीक असलेल्या ‘राजगृह’ची १६ बाय ८ फुटांची थर्माकॉलची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या प्रतिकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘राजगृह’चा बॅकड्रॉप हा बाबासाहेबांच्या ‘राजगृह’तील ग्रंथालयासारखा उभारण्यात आला आहे. या वेळी बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांविषयीच्या मूळ ध्वनीचित्रफिती मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आल्या.चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टीचैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. गुरुवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेला बाबासाहेबांच्या अनुयायांच्या जल्लोष दिवसभर सुरु होता. राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीतर्फे आयोजित तीन दिवसीय कार्यक्रमांत ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी हा देश शुद्रांसह स्त्रियांमुळे टिकल्याचे म्हणत प्रस्थापितांवर आसूड ओढले.अभिवादन सभा‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ’तर्फे राज्यातील २५० आगारांमध्ये अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले. एस.टी. महामंडळाच्या मुंबई सेंट्रल आगार येथील मध्यवर्ती आगारात याचे आयोजन करण्यात आले होते.सामूहिक प्रार्थनाराजभवन येथील कर्मचारी सहनिवास येथे आयोजित कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहिली. या वेळी राजभवन कर्मचाऱ्यांच्या वतीने विजय स्पोटर््स क्लबचे अध्यक्ष अशोक कांबळे यांनी राज्यपालांचे स्वागत केले. कार्यक्रमाला राज्यपालांचे सचिव वेणुगोपाल रेड्डी, उपसचिव परिमल सिंह, परिवार प्रबंधक वसंत साळुंके, तसेच राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी, तसेच त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सुरेल ‘भीमपहाट’१२५व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून, सकाळी ६.०० ते ७.०० आणि सकाळी ९ ते ११ या कालावधीत ‘भीम पहाट’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील गौरव गीतांचा कार्यक्रमही चैत्यभूमी येथे आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, नंदेश उमप, वैशाली माडे यांचा त्यात सहभाग होता.१२५ किलोचा केक माझगाव येथील महाराणा प्रताप चौक येथे स्वाभिमान इव्हेंट यांच्या वतीने आयोजित १२५ किलोचा केक कापण्यात आला. या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते, तर गुरुवारी सकाळी माझगाव ते लव्हलेन या परिसरात मिरवणूक काढण्यात आली. त्याप्रमाणे विक्रोळी येथील कन्नमवार नगर येथेही बौद्धजन सेवा संघाच्या वतीने १२५ किलोचा भलामोठा केक कापण्यात आला.