दिवंगत साहित्यिक जयवंत दळवी यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:06 AM2021-09-18T04:06:46+5:302021-09-18T04:06:46+5:30
मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद बोरीवली शाखा दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी बोरिवली येथे स्व. जयवंत दळवी यांच्या स्मारकाजवळ ...
मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषद बोरीवली शाखा दरवर्षी १६ सप्टेंबर रोजी बोरिवली येथे स्व. जयवंत दळवी यांच्या स्मारकाजवळ त्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम करत असते. या वर्षी कोमसाप बोरिवली शाखा आणि आरती आर्ट अकादमी यांनी हा स्मृतिदिन, नेहमीच्या कार्यक्रमासोबत प्रबोधनकार ठाकरे मिनी नाट्यगृहात संयुक्तपणे आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कोमसाप संस्थापक आणि ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक होते.
माजी नाट्यसंमेलनाध्यक्ष गंगाराम गवाणकर, नाटककार व नाट्य प्रशिक्षक संभाजी सावंत, कोमसाप विश्वस्त रेखाताई नार्वेकर यांनी जयवंत दळवी यांच्याशी निगडित आठवणींना उजाळा दिला. कोमसाप कार्याध्यक्ष नमिता कीर यांनी दळवी यांच्या साहित्याचा आढावा घेतला व आरती आर्ट अकादमीचे अध्यक्ष प्रदीप कबरे यांनी दळवींच्या लेखाचे अभिवाचन करून त्यांच्या कलाकारांद्वारे 'संध्याछाया' या नाटकातील प्रवेश सादर केला.
अनुराधा म्हापणकर यांनी दळवी यांच्या विचारांचे वाचन केले. कीर्ती पाटसकर यांच्या दमदार सूत्रसंचालनामुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. अतिशय नेटकेपणाने सादर झालेल्या या कार्यक्रमात स्व. दळवींचे सुपुत्र गिरीश दळवी यांची कुटुंबीयांसमवेत असलेली उपस्थिती सर्वांना आनंद देऊन गेली. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दळवींशी असलेल्या आपल्या स्नेहसंबंधाच्या आठवणी जागवताना आपल्यासोबत श्रोत्यांनाही भावनावश केले व अशा प्रकारचे साहित्यिक कार्यक्रम व्हायला हवेत, असे आवाहन करताना कार्यक्रमाच्या आयोजनात महत्त्वाचा सहभाग असलेले बोरिवली शाखाध्यक्ष अनुराधा नेरुरकर व कार्यवाह इंद्रसेन चव्हाण यांचे अभिनंदन केले.