यंदा महामानवाला ऑनलाइन अभिवादन; कोरोनाचा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2020 01:15 AM2020-12-03T01:15:08+5:302020-12-03T01:15:30+5:30
महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली आहे.
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमी स्मारकावर येऊ नये. ऑनलाइन अभिवादन करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कोरोना विषाणू संसर्ग स्थिती पाहता समाज माध्यमांद्वारे केले आहे.प्रतिवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला चैत्यभूमी येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. त्यांना महापालिकेच्या वतीने विविध नागरी सेवासुविधा पुरविल्या जातात.
मात्र कोरोना संसर्गाचा धोका कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यंदा चैत्यभूमी येथे प्रत्यक्ष न येता, आपापल्या घरून अनुयायांनी अभिवादन करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे. महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली आहे. त्यामुळे यंदा महामानवाला ऑनलाइनच अभिवादन करावे लागणार आहे.
कोरोनामुळे घरातूनच बाबासाहेबांना वंदन करा
- कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी ऑनलाइन माध्यमाद्वारे, घरातूनच अभिवादन करा, असे आवाहन दलित युथ पॅंथरकडून केले आहे.
- वादळ-वारा, पाऊस, थंडी असे नैसर्गिक संकट आले तरी, महापरिनिर्वाणदिनी जगभरातून भीम अनुयायी दादर येथील चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यासाठी आले आहेत. मात्र मागील आठ महिने देशासह जगावर कोरोनाचे सावट पसरले आहे. कोरोनाने असंख्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
- या रोगावर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे यावर्षी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. चैत्यभूमीवर गर्दी न करता ऑनलाइन माध्यमाद्वारे, घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करावे, असे आवाहन दलित युथ पॅंथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नीलेश मोहिते यांनी केले आहे.
चैत्यभूमी येथे स्वच्छतेचे काम सुरू
महापरिनिर्वाण दिनाची तयारी सुरू आहे. चैत्यभूमी वास्तू तसेच अशोकस्तंभ, तोरणा प्रवेशद्वार यांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. चैत्यभूमी, अशोकस्तंभ, भीमज्योती आदी सर्व ठिकाणी फुलांची सजावट करण्यात येईल. चैत्यभूमी येथे महत्त्वाच्या व्यक्तींसाठी नियंत्रण कक्ष उभारला जाईल. १ अग्निशमन इंजीन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी आणि जल सुरक्षारक्षक तैनात केले जातील. शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रक्षेपण केले जाईल. त्याची लिंक सार्वजनिकरीत्या दिली जाईल.