सलाम माझ्या चौकातील पोलीस, डॉक्टर, पालिका मित्रांना...!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 07:38 PM2020-04-30T19:38:05+5:302020-04-30T19:38:57+5:30
सार्वजनिक मित्र मंडळांचा उपक्रम...
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात लागू असलेल्या लॉकडाऊनदरम्यान केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. परिणामी आपला जीव धोक्यात घालून महापालिका, पोलीस, बँक कर्मचा-यांसह अत्यावश्यक सेवा देणारे कामगार, कर्मचारी कामावर जात आहे. त्यांच्यामुळे मुंबईचा वेग कायम आहे. परिणामी त्यांच्या कार्याचे कौतुकदेखील आता मुंबईकरांकडून केले जात आहे. मुंबईतील सार्वजनिक मित्र मंडळे आणि लोकप्रतिनिधींकडून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, कामगारांचे कौतुक केले असून, कोरोनाला नष्ट करायचे असेल घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले जात आहे.
कोरोनाला थोपविण्यासाठी मुंबईकर घरात बसले असले तरी देखील बेस्ट, महापालिका, वीज कर्मचारी, बँक कर्मचारी, डॉक्टर , नर्स आदी आणि यांच्यासोबत उर्वरित कर्मचारी कार्यरत आहेत. अहोरात्र हे कर्मचारी झटत आहेत. परिणाम मुंबईकरांकडून आता त्यांचे कौतुक केले जात आहे. मुंबई महापालिकेच्या एल विभागातील महाराष्ट्र नवर्निमाण सेनेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी सांगितले की, आम्ही आमच्या प्रभागात अत्यावश्यक सेवा देत असलेल्या कर्मचा-यांना फेसमास्क दिले आहेत. यामध्ये पोलीस, बेस्टचे वाहक आणि चालक, सफाई कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान यांचा यात समावेश आहे. यांना फेस मास्कचे वाटप करतानाच त्यांचे आभार देखील मानले. आज ते त्यांचे कुटूंब सोडून अत्यावश्यक सेवा देण्यासाठी रस्त्यांवर उतरले आहेत. म्हणून आपण सर्व निर्धास्त घरी आहोत,असेही तुर्डे यांनी सांगितले. कुर्ला येथील श्रीकृष्ण क्रीडा मंडळाकडूनदेखील अत्यावश्यक सेवा देत असलेल्या कर्मचा-यांना सलाम करण्यात आला आहे. संजय ढवळे, शशिकांत पाचारणे, शिवाजी देवरे, सनी बोराडे, मधुकर धस, शीतल धस, विलास लोखंडे, विद्या साळवे यांच्या कामाचे कौतुक करत माझ्या चौकातील पोलीस, डॉक्टर आणि पालिका मित्रांना सलाम करण्यात आला आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव किरण रमेश सुर्वे यांनी दिली. कोरोनाचा नायनाट करण्यासाठी दुसरीकडी कुर्ला, चेंबूर आणि चुनाभट्टी ३ मेपर्यंत संपुर्ण बंद असल्याची माहिती शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली. केवळ मेडीकल, दूध, केबल या सेवा सुरु राहणार आहेत. किरणा दुकानदारांनी फोनवर आॅर्डर घेत सोसायटीपर्यंत डिलिव्हरी द्यावी. विनाकारण नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असेही आवाहन येथे केले जात आहे.