भर पावसात निघणार वरात; हॉल बुकिंग, कॅटरिंगसाठी नातेवाइकांची सुरू आहे धावपळ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 12:47 PM2023-06-07T12:47:46+5:302023-06-07T12:49:18+5:30
मार्च, एप्रिल महिन्यांत एकही विवाह मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न रखडली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मार्च, एप्रिल महिन्यांत एकही विवाह मुहूर्त नसल्याने अनेक इच्छुक जोडप्यांची लग्न रखडली होती. मे महिन्यात लग्नासाठी हॉल, भटजी न मिळाल्याने लग्न होऊ शकली नाहीत, आता मात्र विवाहासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना जूनमध्ये विवाह उरकून घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे भर पावसातही वरात धूमधडाक्यात निघणार आहेत.
शुभ मुहूर्त पाहूनच महाराष्ट्रात बरीच जोडपी लग्न करतात. २०२३ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी नंतर लग्नासाठी थेट मे महिन्यात मुहूर्त होते. मात्र मे महिन्यातील उकाडा आणि आधीच फुल्ल झालेले हॉल पाहता अनेक जोडप्यांनी जून महिन्यांत विवाह बंधनात अडकविण्याचा निर्णय घेतला आहे. जूनमध्ये बरेच मुहूर्त असल्याने लग्नासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना दिलासा मिळाला आहे. तर काही जोडप्यांनी आपल्या सोयीनुसार आपत्कालीन मुहूर्तावर लग्नाचा निर्णय घेतला आहे.
५ महिने मुहूर्त नाही
विवाह इच्छुक जोडप्यांना जून महिन्यात विवाहासाठी ११ मुहूर्त आहेत. जून नंतर थेट नोव्हेंबर महिन्यात विवाह करता येणार आहे. पाच महिने मुहूर्त नसल्याने जूनमध्ये लग्न उरकण्यासाठी कॅटरिंग तसेच मंगल कार्यालये बुक करण्याची धावपळ जोडप्यांच्या नातेवाइकांकडून सुरू आहे.
२०२३ मधील लग्नाचे मुहूर्त
जून : १, ३,५, ६, ७, ११, १२, २३, २४, २६, २७
नोव्हेंबर : २३, २४, २७, २८, २९
डिसेंबर : ५, ६, ७, ८, ९, ११, १५
आपत्कालीन मुहूर्त
जून : ३०
जुलै : १, २, ४, ५, ९, १०, ११, १४
ऑगस्ट : २२, २६, २८, २९
सप्टेंबर : ३, ६, ७, ८, १७, २४, २६
ऑक्टोबर : १६, २०, २२, २३, २४, २६
नोव्हेंबर : १, ६, १६, १८, २०, २२
मंगल कार्यालयांचे बुकिंग जोरात
दीड महिने लग्नाचे मुहूर्त नसल्याने जूनमध्ये मंगल कार्यालयांचे बुकिंग या पूर्वीच सुरू झाले आहे. अनेक लग्न खोळंबल्याने बुकिंग जोरात सुरू आहे. अनेकांची हॉल बुकिंगसाठी शोधाशोध सुरू आहे.
आपत्कालीन मुहूर्ताचा पर्याय
घरात कोणी व्यक्ती आजारी आहे. त्यांच्या इच्छेसाठी लग्न लावायचे आहे. एखादी व्यक्ती परदेशात काम करते. अशा लोकांना दिवाळी नंतर हजर राहणे शक्य होणार नाही. ज्यांचा साखरपुडा झाला आहेत व वेळेत लग्न उरकायचे आहेत अशा लोकांसाठी आपत्कालीन मुहूर्त असतात.