ग्रोसरी, क्रॉकरीचा अनोखा बिझनेस!
By admin | Published: June 28, 2015 03:30 AM2015-06-28T03:30:24+5:302015-06-28T03:30:24+5:30
उच्च शिक्षण घेतल्यानंतर गलेगठ्ठ पगाराची नोकरी शोधली जाते. मात्र ही चाकोरीबद्धता मोडत पुण्याच्या सिम्बायोसीसमध्ये शिकलेल्या अर्पिता पर्वतकर-देव हिने नवा पायंडा पाडला.
उद्यमनगरी
- स्नेहा मोरे
उच्च शिक्षण घेतल्यानंतर गलेगठ्ठ पगाराची नोकरी शोधली जाते. मात्र ही चाकोरीबद्धता मोडत पुण्याच्या सिम्बायोसीसमध्ये शिकलेल्या अर्पिता पर्वतकर-देव हिने नवा पायंडा पाडला. समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांमध्ये पारंगत असूनही अर्पिताने करिअरच्या वेगळ््या वाटांचा शोध घेतला. ऐन उमेदीच्या काळात पंचतारांकित हॉटेल्सला मातीची भांडी आणि किराणा पोहोचविण्याचे काम सुरू केले. काही कालावधीतच वेगळ््या उद्योग क्षेत्रात अर्पिताने आपल्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे यश मिळवले आहे.
मध्यमवर्गीय घरात जन्मलेली अर्पिता उत्तम गायिका असून, गेली अनेक वर्षे ज्येष्ठ गायिका किशोरी आमोणकर यांच्याकडून संगीताचे धडेही गिरवत आहे. याशिवाय अर्पिताची आईही आर्टिस्ट असून, बाबा उत्तम म्युझिशिअन आहेत. त्यामुळे मानव संसाधन क्षेत्राचे शिक्षण, गायन असे करिअरचे अनेक पर्याय समोर असूनही अर्पिताने ‘बिझनेस वूमन’ होण्याचा वेगळा निर्णय घेतला. सुरुवातीला या उद्योग क्षेत्रात अनेक अडथळेही समोर आले, मात्र त्यांना डावलून आज आपण या क्षेत्रात स्थिरस्थावर झाल्याचे अर्पिता सांगते.
मुंबई, पुणे आणि गोव्यातील पंचतारांकित आणि सप्ततारांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सना ग्रोसरी, क्रॉकरी, पिलो, गाद्या पोहोचविण्याचे काम ती करते. ‘गुड आय कन्सलटंट’ अशी स्वत:ची कंपनी उभारून अर्पिताने समाजातील महिलांसमोर आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कंपनीचे नेतृत्व सांभाळत अर्पिता आपल्या पाच सहकाऱ्यांच्या मदतीने ही कंपनी सांभाळते आहे.
हॉटेल्समध्ये दर आठवड्याला या वस्तूंचा पुरवठा केला जातो. आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक हॉटेल ग्राहकाची अपेक्षा वेगळी असल्याने त्यांच्या आवडी-निवडींविषयी अपडेट राहावे लागते. शिवाय या वस्तूंच्या बाजारपेठेतील अद्ययावत ट्रेंड्सवरही आम्हाला लक्ष ठेवावे लागते.
पुणे आणि गोव्यातील प्रसिद्ध हॉटेल्समध्ये अर्पिता मातीची भांडी आणि किराणा पुरविते. त्याचप्रमाणे किचन, गेस्ट रूम आणि लिननच्या बेड्शीट्स, नॅपकिन्स आणि रनर्स ही अर्पिताच्या कंपनीची वैशिष्ट्ये आहेत. यातील कामाच्या अनुभवाविषयी ती म्हणते की, ग्राहकाला काय हवे आहे यापेक्षा उद्योजक म्हणून आपण ग्राहकाला सर्वाेत्तम कसे देऊ शकतो याचा विचार आम्ही कायम करतो. त्यामुळे वेगवेगळ््या दर्जांच्या हॉटेल्समध्ये बारीकसारीक गोष्टीबाबत हा विचार करावा लागतो. हॉटेल्समध्ये क्रॉकरीचा पुरवठा करायचा असल्यास हॉटेल्समध्ये येणारे ग्राहक, त्यांचा वर्ग, हॉटेलच इंटिरिअर अशा सर्वच गोष्टींचा विचार करावा लागतो.
माझे बाबा पंचतारांकित हॉटेलमध्ये काम काम करतात. त्यामुळे या क्षेत्रातील चढउतार मी जवळून पाहिले आहेत. मात्र तरीही बाबा आणि पतीच्या पाठिंब्यामुळे या क्षेत्रात उद्योग करण्याचा धाडसी निर्णय घेतल्याचे अर्पिता अभिमानाने सांगते.
शिवाय या क्षेत्रात अशाप्रकारे एका महिलेने सुरू केलेली ही पहिलीच कंपनी असल्याचा दावाही अर्पिता करते.