ग्राउंड रिपोर्ट - ईशान्य मुंबईत मराठी मतांचा टक्का ठरणार निर्णायक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 04:17 AM2019-04-26T04:17:40+5:302019-04-26T04:18:25+5:30
मनसे फॅक्टर महत्त्वाचा। वंचित बहुजन आघाडीमुळे होणार मतांची फाटाफूट
मनीषा म्हात्रे
भाजपतील जाहीर अंतर्गत विरोध आणि शिवसेनेच्या दबावाचे निमित्त साधत किरीट सोमैय्या यांचा पत्ता कापण्यात आल्याने उत्तर पूर्व मुंबईतील लढतीकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. लढत जरी युती-आघाडीत असली, तरी रिंगणाबाहेर असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा करिष्मा आणि मराठी मतांच्या कौलावर दोन्ही प्रतिस्पर्ध्यांची भिस्त आहे.
गेल्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत महायुतीचे उमेदवार किरीट सोमैया साडेतीन लाखांच्या फरकाने विजयी झाले होते. मात्र यंदा त्यांच्याऐवजी भाजपने तीन वेळा नगरसेवक, पालिकेचे गटनेते असलेल्या मनोज कोटक यांना रिंगणात उतरवले. त्यांच्या जोडीला मतदारसंघातील महायुतीचे पाच आमदार, २८ नगरसेवक आहेत. अन्य नगरसेवकांशी कोटक यांचे चांगले संबंध आहेत. पण मुलुंड किंवा भांडुप वगळता उर्वरित चार विधानसभा मतदारसंघातील मतदारांना त्यांची फारशी ओळख नाही. सोमैया प्रचारात इतके अग्रेसर आहेत, की ते नव्हे, यंदा मी उमेदवार आहे, हे मतदारांवर बिंबवण्याचे प्रमुख आव्हान त्यांच्यासमोर आहे. विजयासाठी मराठी मते निर्णायक ठरू शकतील, हे लक्षात घेऊन त्यांनी मराठी वस्त्या प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवल्या आहेत.
महाआघाडीचे उमेदवार संजय पाटील यांची मदार वैयक्तिक संपर्क आणि मनसेच्या जाहीर सभांमुळे प्रभावित होणाऱ्या मराठी मतांवर अधिक आहे. गेल्या निवडणुकीआधी सोमय्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी एकही पूर्ण केले नसल्याकडे ते आक्रमकपणे मतदाराचे लक्ष वेधत आहेत. मागील लढतीत मोदी लाट आणि ‘आप’चा प्रभाव असूनही पाटील यांनी सव्वादोन लाख मते मिळवली. २००९ पेक्षा त्यांना ४३४० मते अधिक मिळाली. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातूनच त्यांनी २० हजारांवर मतांची आघाडी घेतली होती. यंदा ‘आप’ऐवजी प्रकाश आंबेडकर- अकबरुद्दीन ओवेसीप्रणित वंचित बहुजन आघाडी रिंगणात आहे. या आघाडीच्या उमेदवार निहारिका खोंदले यांना राजकीय पार्श्वभूमी नसली, तरी मतदारसंघात त्यांची मोठी व्होट बँक आहे. त्यांनी पाटील यांच्या व्होटबँकेला धक्का लावला, तर त्या मतविभागणीचा फायदा कोटक यांना मिळू शकतो.
या मतदारसंघात सहा लाखांवर मराठी मते आहेत. त्यामुळेच येथे राज ठाकरे यांनी सभा घेतली. त्याखालोखाल प्रत्येकी सुमारे दोन लाख गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम मतदार आहेत. उत्तर भारतीय मते यंदा युती आणि आघाडीत विभागली जातील, असा अंदाज आहे. त्यामुळे मराठी मतांइतकीच मुस्लिम मतेही निर्णायक ठरू शकतात.
मोदी लाट राहिलेली नाही. ईशान्य मुंबईतही मतदारांचा अपेक्षाभंग झाला. त्याचा परिणाम दिसतो आहे. आमच्या प्रचारात, मित्रपक्षांबरोबर सामान्य नागरिक आहेत. भाजपचा कारभार आणि त्या पक्षाच्या उमेदवारावरील संताप निवडणुकीच्या निकालात दिसून येईल.
- संजय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार
मित्रपक्षासह लाखांहून अधिक कार्यकर्ते उत्साहाने प्रचार करत आहेत. ईशान्य मुंबईतील मतदारांनीही नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान बनविण्याचे ठरवले असल्याने, ते मला म्हणजेच महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणतील, असा विश्वास आहे.
- मनोज कोटक, भाजपचे उमेदवार
कळीचे मुद्दे
मराठी मतांपाठोपाठ सुमारे दोन लाख गुजराती मते लक्षात घेत खासदार मराठी की गुजराती? हा प्रश्न प्रचारात केंद्रस्थानी आहे.
उत्तर भारतीय मतदार यावेळी सरसकट एकच कौल देणार नाहीत, असा आघाडीचा दावा आहे, तर तो मतदार मागील वेळेप्रमाणे युतीच्या सोबत असेल, असा त्या नेत्यांचा दावा आहे.