मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गट विमा योजना लागू केली जाणार असली तरी अजूनही सुमारे ११ हजार कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक माहितीचे विवरणपत्र सादर केले नसल्याने गट विमा योजनेच्या अंलबजावणीला मुहूर्त मिळालेला नाही. आतापर्यंत फक्त ८५ टक्केच कर्मचाऱ्यांनी विवरण पत्रे सादर केली आहेत.
पालिकेच्या हजेरी पटावरील ९१ हजार ४३६ कर्मचाऱ्यांपैकी ७९ हजार ७६२ कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीचे विवरण पत्र सादर केले आहे. तर ११ हजार ६७४ कर्मचाऱ्यांनी विवरण पत्रे दिलेली नाहीत. विवरण पत्रे सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने घन कचरा व्यवस्थापन, रुग्णालये, शिक्षण खाते, अग्निशमन दल या खात्यातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व खात्यातील कर्मचाऱ्यांनी माहिती भरून देण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. गट विमा योजना लागू होण्यासाठी कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती आवश्यक असून त्याच आधारे विमा कंपन्यांसोबत वाटाघाटी करून प्रीमियमची रक्कम ठरवता येणे शक्य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
यासंदर्भात प्रशासन आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची नुकतीच बैठक झाली. यावेळी गट विमा योजना राबवण्यासाठी केल्या जात असणाऱ्या प्रयत्नांची माहिती प्रशासनाने दिली. उर्वरित कर्मचाऱ्यांनी विवरण पत्रे लवकर सादर केली तर गट विमा योजना शक्य तेवढ्या लवकर लागू करता येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.