Join us

२५ हून अधिक संस्थांमध्ये समूह विद्यापीठाची क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 11:00 AM

मुंबईतील अनेक संस्था इच्छुक, सेंट झेवियर्स, एसव्हीकेएम, रूईया आदींचाही रस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकाचवेळी कला, विज्ञान, वाणिज्य, बीएड, विधी अशा बहुविद्याशाखीय शिक्षणाची संधी देणारी समूह विद्यापीठ स्थापण्याची क्षमता राज्यातील २५ हून अधिक संस्थांमध्ये आहे. यासाठी सुमारे २० संस्थांसह मुंबईतील सेंट झेवियर्स, एसव्हीकेएम, रूईया आदी महाविद्यालयांच्या संस्थांनी समूह विद्यापीठ स्थापन करण्यात रस दाखवला आहे. या शिवाय सोमय्या, ठाकूर अशा संस्थांमध्येही समूह विद्यापीठे स्थापन करण्याची क्षमता आहे.

या विद्यापीठांना स्वत:चे अभ्यासक्रम सुरू करण्याची, त्यांचा अभ्यासक्रम ठरविण्याची मुभा असेल. जिल्ह्यातील स्थानिक गरजांनुसार अभ्यासक्रम निवडता येतील, अशी माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. २०२०च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात समूह विद्यापीठांच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्याची भूमिका मांडण्यात आली आहे. 

राज्यातील अस्तित्वात असलेली समूह विद्यापीठे- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ (सरकारी अनुदानित),  हैदराबाद सिंध नॅशनल कॉलिजिएट विद्यापीठ (दोन्ही मुंबईत),  कर्मवीर भाऊराव पाटील (सातारा).

समूह विद्यापीठ कुणाला होता येईल?     राज्य सरकारकडे पाच कोटी मुदत ठेव बंधनकारक.      एकाच व्यवस्थापन किंवा शैक्षणिक संस्थेच्या किमान दोन व कमाल पाच अनुदानित किंवा विनाअनुदानित महाविद्यालयांना.     नॅकचे किमान ३.२५ सीजीपीए मानांकन किंवा समतुल्य एनबीए गुण असणे आवश्यक.      एकत्रित १५ हजार चौरस मीटर बांधकाम व विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी ४ हेक्टर व उर्वरित ठिकाणी ६ हेक्टर जागा आवश्यक     महाविद्यालयात दोन हजार तर संस्थांची मिळून किमान चार हजार विद्यार्थी संख्या.      लीड (प्रमुख) महाविद्यालयाला किमान पाच वर्षे स्वायत्तता.      संस्थांना पहिले पाच वर्षे सरकारकडून प्रतिवर्ष एक कोटी.

एका जिल्ह्यातील एकाच संस्थेच्या पाच महाविद्यालयांना एकत्र येऊन स्वत:चे समूह (क्लस्टर) विद्यापीठ स्थापता येईल. या विद्यापीठांची रचना २०१६च्या ‘महाराष्ट्र विद्यापीठ कायद्या’नुसार सुरू असलेल्या विद्यापीठांप्रमाणेच असेल. आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि कृषी विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये वगळता अन्य सर्व महाविद्यालयांना यात सहभागी होता येईल.

टॅग्स :विद्यापीठमुंबई