मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना ‘टार्गेट’ केले जात असल्याच्या घटना डोके वर काढत आहेत. अशात बनावट संकेतस्थळावरून नामांकित कंपनीत नोकरी देण्याचे आमीष दाखवून तरुणांच्या हाती बनावट ऑफर लेटर देत फसवणूक होत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या ठगांपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
चेंबूर येथे राहणारे अयुब सय्यदही या टोळीच्या जाळ्यात अडकले. त्यांना कोका कोला कंपनीच्या नावे ई-मेल आला. त्यात नोकरीचे आमीष दाखविण्यात आले होते. या मेलमुळे गेल्या ८ महिन्यांपासून बेरोजगार असलेल्या सय्यदच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्याने ई-मेलला प्रतिसाद देताच, ‘त्याला नोकरी करण्यापूर्वी दिल्लीत प्रशिक्षण दिले जाईल. त्यांना विनामूल्य विमान तिकीट आणि प्रशिक्षण दिले जाईल’, असे सांगितले होते आणि ‘सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून आठ हजार रुपये द्यावे लागतील’, असे सांगितले. सय्यदने यावर विश्वास ठेवून ८ हजार ७३० रुपये पाठवले. मात्र, पैसे देऊनही विमान तिकीट न मिळाल्याने त्याने पुन्हा संबंधित तरुणाला कॉल केला. मात्र, त्यांचा कॉल बंद लागला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
मुंबई सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी सांगितले की, सय्यदच्या तक्रारीनंतर तत्काळ त्याचे पैसे फ्रीज केल्यामुळे ते वाचले. त्यामुळे अशा मेलपासून सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. प्रथम कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन खातरजमा करा. प्रत्येक मोठी कंपनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर रिक्त जागांची जाहिरात दाखवते, ज्यामुळे अधिकाधिक लोक या माहितीपर्यंत पोहोचू शकतील. तसेच मोठी कंपनी कधीही सिक्युरिटी डिपॉझिटच्या रूपात पैसे मागत नाही, असेही सांगितले.
बनावट ऑफर लेटर
यात तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट ऑफर लेटरही देण्यात येत आहे. त्यामुळे अनेक तरुण या जाळ्यात अडकत आहेत.
फसवणुकीच्या अशाही घटना
‘सीए’च्या विद्यार्थ्याला ९६ हजारांचा गंडा
इंटरनॅशनल कंपनीत नोकरी लावण्याचे आमीष दाखवून मस्जीद बंदर येथील ३० वर्षीय ‘सीए’च्या विद्यार्थ्याची फसवणूक केल्याप्रकरणी पायधुनी पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘नोकरी डाॅट काॅम’वरुन बोलत असल्याचे सांगून एकाने कॉल केला. कॅनडातील इंटरनॅशनल कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागल्याचे सांगितले. तसेच प्रोसेसिंग फीच्या नावाखाली २९ ऑक्टोबर २०२० ते २७ जून २०२१ दरम्यान संबंधित तरुणाकड़ून ९३ हजार ५०० रुपये उकळले.
जहाज़ावरील नोकरी पडली १ लाख २० हजार रूपयांना
नोकरीचे आमीष दाखवून देवनार परिसरात २९ वर्षीय तरुणाची सव्वादोन लाखांना फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप जोशी नावाच्या ठगाने या तरुणाला न्यू व्हेन्चर शिपमध्ये नोकरी लावण्याचे आमीष दाखवले होते. अशात त्याला नोकरी लागल्याचे सांगून त्याच्याकड़ून विविध शुल्काच्या नावाखाली फसवणूक केली. यात १ लाख २० हजार रुपये घेऊन ठग नॉट रिचेबल झाला.
क्रेडिट कार्ड आणि फसवणुकीच्या घटना
२०१९ : ७७५ / ४०
२०२० : ५५८ / २१
२०२१ (मेपर्यंत ) : २०३/ १८