नवी दिल्ली/मुंबई : शनिवारी इंधन दरांत पुन्हा एकदा वाढ झाल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल शंभरी पार गेले आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर येथे पेट्रोल सर्वांत महाग आहे.तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शनिवारी पेट्रोल २६ पैशांनी, तर डिझेल २८ पैशांनी महाग झाले. ही ४ मेनंतरची १५ वी दरवाढ ठरली. त्यामुळे दोन्ही इंधनाचे दर पुन्हा एकदा नव्या सार्वकालिक उच्चांकावर गेले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर १०० रुपयांपेक्षा जास्त झाला. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल १००.१९ रुपये लिटर, तर डिझेल ९२.१७ रुपये झाले. मुंबईत पेट्रोल पहिल्यांदाच शंभरी पार गेले आहे. राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल याआधीच शंभरीपार गेले होते परंतु महानगरांमध्येही पेट्रोलने पहिल्यांदाच हा उच्चांक गाठला आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर येथेे पेट्रोल १०५.१५ रुपये लिटर, तर डिझेल ९७.९९ रुपये लिटर असून, हा सर्वोच्च दर आहे.निवडणुकांमुळे दरवाढीत १८ दिवसांचा खंड गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांमुळे सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ १८ दिवस रोखून धरली होती. निवडणुका संपताच दरवाढ पुन्हा सुरू केली. ४ मेपासून आतापर्यंत १५ वेळा दरवाढ झाली असून, या काळात पेट्रोल ३.५४ रुपयांनी, तर डिझेल ४.१६ रुपयांनी महाग झाले आहे.उत्पादन शुल्क आणि राज्यांचे व्हॅटभारतात पेट्रोल-डिझेलवर मोठ्या प्रमाणात कर लावण्यात आले आहेत. पेट्रोलच्या किमतीतील ६० टक्के, तर डिझेलच्या किमतीतील ५४ टक्के हिस्सा करात जातो. केंद्र सरकारकडून पेट्रोलवर प्रतिलिटर ३२.९० रुपये, तर डिझेलवर ३१.८० रुपये उत्पादन शुल्क आकारले जाते. याशिवाय राज्यांकडून दोन्ही इंधनांवर व्हॅट आकारला जातो. व्हॅटचा दर भिन्न असल्यामुळे प्रत्येक राज्यातील दर भिन्न असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरानुसार भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर ठरतात. प्रमुख महानगरांतील दर शहर पेट्रोल डिझेल नवी दिल्ली ९३.९४ ८४.८९मुंबई १००.१९ ९२.१७कोलकाता ९३.९७ ८७.७४चेन्नई ९५.५१ ८९.६५दर रू./प्रतिलिटर
वाढता वाढता वाढे! मुंबईत पेट्रोल दर शंभरीपार; महिन्यातील १५वी वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 6:19 AM