धरणांत वाढतेय, नळांतून आटतेय! पाऊस कोसळतोय, पण पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:14 AM2023-07-19T11:14:52+5:302023-07-19T11:15:15+5:30
पाणीकपात १० टक्के की जास्त? : त्रस्त मुंबईकरांचा सवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मंगळवारी दुपारी चारकोप आणि गोराई परिसरात पाणीच आले नाही, तर काही ठिकाणी उशिरा आलेले पाणी अगदी कमी दाबाने आले. काही ठिकाणी पाण्याची वेळ कमी झाली. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मंगळवारी विलेपार्ले येथील बोगद्यातील पाण्याच्या कमी दाबामुळे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. परिणामी, आधीच १० टक्के कपातीमुळे कमी येणारे पाणी आणखी कमी आल्यामुळे या परिसरांत पाणीबाणी निर्माण झाल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे पालिकेची पाणीकपात ही नक्की १० टक्के आहे की ४० टक्के, असा प्रश्न मुंबईकर पालिका अधिकाऱ्यांना विचारू लागले आहेत.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा हळूहळू वाढत असून, मंगळवारी पाण्याची पातळी ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचली. मुंबईकर १ जुलैपासून पालिकेने लागू केलेल्या १० टक्के पाणीकपातीने हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी पाणी उशिरा येण्याच्या, कमी दाबाने येण्याच्या आणि काही ठिकाणी तर पाणीच येत नसल्याने टँकर मागविण्याच्या तक्रारी आता मुंबईकर करू लागले आहेत. चारकोपमध्ये नऊ सेक्टर असून, बहुसंख्य सेक्टरमध्ये नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. पूर्वीपेक्षा अर्धा तास पाणी कमी येत असून, पाण्याला दाब नसल्याने वेग कमी आहे. बोरिवली पूर्व, गोरेगाव पूर्व, अंधेरी पूर्व, चुनाभट्टी तसेच येथील नटवर परिसरातून नागरिक सातत्याने पाण्याविषयी तक्रारी करत आहेत.
पाणीसाठा ३५ टक्क्यांहून अधिक
सात तलावांमध्ये मिळून सोमवारचा (दि. १७) पाणीसाठा जेमतेम ३५ टक्क्यांहून अधिक म्हणजे ५ लाख १६ हजार ६९८ दशलक्ष लिटरवर पोहोचला होता. गेल्या वर्षी याच दिवशी साठा ८४.४१ टक्के म्हणजे १२ लाख २१ हजार ७८३ दशलक्ष लिटर इतका होता.
गेल्या वर्षीही पाणीसाठा ११ टक्क्यांपर्यंत खाली गेल्यामुळे २७ जूनपासून पाणीकपात लागू केली होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीपासून तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस पडल्यामुळे दोन आठवड्यांनंतर कपात मागे घेण्यात आली होती.
पालिका प्रशासन म्हणतेय...
सध्या तरी पाणीकपातीमध्ये वाढ करण्याचा विचार पालिका प्रशासनाने घेतलेला नाही.
या महिन्याच्या अखेरीपर्यंत मुंबईत किती पाऊस पडतो आणि धरणातील पाणीसाठा किती वाढतो यावर लक्ष ठेवले जाईल, अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
या वर्षी पाणीकपात कधी रद्द होणार, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. मात्र, मुंबईला पाणी पुरविणाऱ्या तलावांत समाधानकारक साठा जमा होईपर्यंत ही कपात लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे आणि पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
१८ जुलैचा तलावातील पाणीसाठा
तलावा २०२३ २०२२
अप्पर वैतरणा २६,३७३ १,६४,२४९
मोडक सागर ७५,८२८ १,२८,९२५
तानसा ९५६०३ १,४४,००५
मध्य वैतरणा ९३,८०३ १,७५,३६२
भातसा २,०४,९२१ ५,८२,२५९
विहार १४,१४६ १८,९३७
तुळशी ६०२६ ८०४६