Join us

व्हॉट्सॲपवरून वाढतेय न्यूड व्हिडिओ कॉलचे जाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:06 AM

मुंबई : सोशल मीडियावरून आधी मैत्री करायची. नंतर मोबाइल क्रमांक शेअर होताच, अश्लील संवादानंतर व्हॉट्सॲपवरून न्यूड व्हिडिओ कॉलद्वारे समोरच्या ...

मुंबई : सोशल मीडियावरून आधी मैत्री करायची. नंतर मोबाइल क्रमांक शेअर होताच, अश्लील संवादानंतर व्हॉट्सॲपवरून न्यूड व्हिडिओ कॉलद्वारे समोरच्या व्यक्तीलाही आपल्या मधाळ जाळ्यात ओढायचे. सावज फसताच पुढे हेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी उकळणारे रॅकेट कार्यरत आहे. त्यांच्यापासून सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यात उच्चशिक्षित मंडळी जास्त अडकत आहे.

नुकतेच अंधेरीत अशा स्वरूपाचे दोन गुन्हे आठवडाभरात नोंद झाले आहेत. पहिल्या गुन्ह्यात खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणाने २३ जून रोजी रिया वर्मा नावाच्या अनोळखी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. पुढे, काही दिवस महिलेसोबत संवाद झाला. अशात २६ जून रोजी सकाळी आंघोळ करत असताना महिलेचा व्हिडिओ कॉल आला. त्यांनी कॉल घेताच एक विवस्त्र महिला त्यात दिसून आली. त्यांनी तात्काळ कॉल कट केला. पुढे दोन ते तीन वेळा त्या क्रमांकावरून फोन आला. मात्र, त्यांनी तो उचलला नाही. त्यानंतर संबंधित महिलेने कॉल करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, ५० हजार रुपयांची मागणी केली. बदनामीच्या भीतीने त्यांनी २१ हजार रुपये ऑनलाइन पाठवले. पुढे आणखीन पैशांची मागणी करताच त्यांनी कॉल घेणे बंद केले. काही दिवसाने त्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याचे त्यांच्या मित्रांकडून समजताच त्यांनी पोलिसांत तक्रार दिली.

त्यापाठोपाठ नामांकित बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयात उपव्यवस्थापक पदावर नियुक्त तरुणाला काही दिवसांपूर्वी एका महिलेने मैत्रीसाठी ‘रिक्वेस्ट’ पाठवली. त्याने ती स्वीकारल्यानंतर सुरुवातीला या दोघांत फेसबुकवरून गप्पा रंगू लागल्या. त्यानंतर या महिलेने तरुणाकडून व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक मिळवला आणि तरुणाला व्हिडिओ कॉल केला. तरुणाने कॉल उचलताच फोन करणारी महिला विवस्त्र असल्याचे त्याला दिसले. त्यानंतर या महिलेने त्यालाही विवस्त्र होण्यास सांगताच तोही विवस्त्र झाला. त्यांचे चाळे महिलेने रेकॉर्ड करून त्याद्वारे तरुणाकडून ४० हजार उकळले.

आलेख (फेक प्रोफाइल, मॉर्फिंग, एसएमएस, ईमेल्स)

मुंबई पोलिसांकडे दाखल गुन्हे

वर्ष- २०१९- तक्रारी - ६१

वर्ष- २०२०- तक्रारी- ३०

वर्ष-२०२१ (जानेवारी ते मेपर्यंत) - तक्रारी- १९

काय करावे...

सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी एका मर्यादेच्या पलीकडे चॅट करणे टाळा. समोरची व्यक्ती खरच मुलगी, मुलगा आहे की ठग याची खातरजमा करा. फेसबुकवरील अनोळखी मित्र-मैत्रिणीकडे वैयक्तिक माहिती शेअर करू नका. कुणी सतत मेसेज करत असेल तर त्याला ब्लॉक करा. अश्लील कॉलच्या मोहात पडू नका. तरीही फसवणूक करत असल्याचा संशय येताच तात्काळ पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन सायबर विभागाकडून करण्यात येत आहे.