मुंबई : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पार चढलेला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत सतत बदलणाऱ्या हवामानामुळे मुंबईकरांना सर्दी, खोकला असा त्रास सुरू झाला आहे. पण सध्या तापमान वाढत असल्यामुळे उकाड्याच्या त्रासामुळे मुंबईकर आजारी पडू शकतात. यामुळे आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला डॉक्टर देत आहेत. थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याचा हा हवामान बदलाचा काळ आहे. या कालावधीत जंतुसंसर्गाचा धोका जास्त वाढतो. यामुळेच संसर्गजन्य आजार वाढतात. उन्हाचा कडाका वाढल्यामुळे थकवा जाणवणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे असेही त्रास वाढतात. हे सहज टाळता येऊ शकते. पण त्यासाठी स्वत:ची काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.अचानक थंडी संपून उन्हाळा चालू झाल्यावर तिखट, मसालेदार पदार्थ कमी खावेत. उष्ण तापमानात असे पदार्थ खाल्यास पोटात दुखणे, गळ््यात जळजळ असे त्रास होऊ शकतो. दुपारच्या वेळी उन्हात फिरताना डोके झाकण्याची आवश्यकता आहे. कारण जास्त ऊन लागल्यास डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. याचबरोबरीने जास्त काळ उन्हात फिरल्यास शरीर थकते. शरीरातील पाणी कमी होऊ शकते, असे डॉ. वरदा वाटवे यांनी सांगितले. जास्त उन्हात फिरल्यास त्वचेलाही त्रास होतो. मुंबई सारख्याशहरात घाम येत असल्यामुळे त्वचेला चटके बसत नाहीत. पण जास्त घाम आल्यावर जास्त काळ त्वचेवर राहिल्यास खाज सुटणे अथवा पुरळ येणे असा त्रास जाणवू शकतो. जास्त उन्हात फिरल्यामुळे डोळे लाल होणे, जळजळ होणे असा त्रास जाणवू शकतो. उन्हाळ््याचा त्रास टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे पाणी योग्य प्रमाणात पिणे गरजेचे आहे. लिंबू सरबत, कोकम सरबत प्या; पण कोल्ड ड्रिंक्स पिणे टाळा. दिवसातून दोनदा अंघोळ करा, असा सल्ला डॉ. वाटवे यांनी दिला. (प्रतिनिधी)