भार्इंदर : पालिकेच्या टेंबा रुग्णालयासाठी सल्लागाराची नियुक्ती रुग्णालय बांधकामावेळी न करता इमारत पुर्ण झाल्यानंतर करण्यात आल्याने टेंबा रुग्णालयावरील अनाठायी खर्चात सुमारे १६ लाखांची वाढ झाली असुन पालिकेला उशीरा सुचलेले शहाणपण असल्याची चर्चा सुरु आहे. मीरा-भार्इंदर शहरात २०० खाटांचे रुग्णालय सुरु करण्याचा ठराव २००३ मध्ये महासभेत मंजुर करण्यात आला. रुग्णालय बांधकामाच्या १४ कोटींच्या खर्चाला २००८ मध्ये महासभेत मंजूरीमिळाली. २००९ मध्ये रुग्णालय बांधकामाचा ठेका मे. किंजल कंस्ट्रक्शनला देण्यात आला. बांधकाम पुर्णत्वाची मुदत आॅगस्ट २०१० पर्यंत असली तरी प्रशासनाकडुन त्याला अनेकदा मुदत वाढ देण्यात आली. त्याच काळात महागाई वाढल्याचा फटका रुग्णालयाच्या बांधकामाला बसु लागल्याने ते रखडु लागले. ठेकेदाराने महागाईचे कारण पुढे करुन रुग्णालयाच्या वाढीव खर्चाची मागणी पालिकेकडे केली. ३० मे २०११ रोजीच्या महासभेत वाढीव खर्चाची मागणी मान्य करण्यात आली. ४ मजली रुग्णालयाच्या इमारतीसाठी अद्याप सुमारे १५ कोटी १९ लाख रु. खर्च करण्यात आले आहे. हे रुग्णालय चालविणे डोईजड असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर ते सामाजिक अथवा धर्मदाय संस्था किंवा राज्य शासनाकडुन चालविण्याचा ठराव १४ डिसेंबर २०१२ रोजीच्या महासभेत मंजुर करण्यात आला. परंतु, न्यायालयीन प्रक्रीयेत अडकलेले रुग्णालय पालिकेनेच सुरु करण्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने रुग्णालय आवारातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुग्णालयात स्थलांतर करुन सध्या तेथे बाह्य रुग्ण विभाग सुरु केला आहे. हे रुग्णालय लवकर सुरु करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने पावले उचलली असुन त्यासाठी रुग्णालय सल्लागाराची नियुक्ती करण्याच्या प्रस्तावावर आयुक्तांकडुन शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. परंतु, रुग्णालय बांधकामावेळी ठेकेदाराकडुन त्या सल्लागाराची नियुक्ती होणे अपेक्षित होते.
टेंबा रुग्णालयाच्या खर्चात झाली अनाठाई वाढ
By admin | Published: November 05, 2014 10:33 PM