Join us

रुग्णवाढ कायम, मात्र खाटा रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:07 AM

उपनगरात लक्षणेविरिहत रुग्ण अधिकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाला एक वर्ष उलटून गेल्यानंतर आता पुन्हा एकदा तीव्र संक्रमणाने ...

उपनगरात लक्षणेविरिहत रुग्ण अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाला एक वर्ष उलटून गेल्यानंतर आता पुन्हा एकदा तीव्र संक्रमणाने डोके वर काढले आहे. शहरातील दैनंदिन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. मात्र रुग्ण वाढीचा आलेख कायम असला तरीही रुग्णालय आणि कोविड केंद्रांतील खाटा रिक्त असल्याची माहिती मुंबई महानगर पालिका प्रशासनाने दिली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांमध्ये लक्षणेविरहित आणि सौम्य लक्षणे असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने या रुग्णांवर घरगुती अलगीकरणात उपचार केले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले.

मुंबईत लक्षणेविरहित असलेल्या ७० टक्के रुग्णांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे. तर, एकूण खाटांपैकी ५३ टक्के खाटा रिक्त आहेत. पण, यातही ऑक्सिजन खाटांची गरज वाढली आहे. पालिकेच्या डॅशबोर्डच्या मते, सध्या मुंबईत २३ हजार ४४८ सक्रिय कोविड-१९ रुग्ण आहेत. यापैकी ७० टक्के म्हणजेच १५ हजार २० रुग्ण लक्षणेविरहित आहेत. रुग्णालयात एकूण १३ हजार ५१४ खाटा उपलब्ध आहेत, त्यापैकी ७ हजार १८३ भरलेल्या आहेत. तर, ८ हजार ४६१ ऑक्सिजन खाटांपैकी ४ हजार ८७ खाटा भरलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ९६६ व्हेंटिलेटर खाटांपैकी ६५७ खाटा भरलेल्या आहेत. सध्या सीसीसी-१ मधील १२ हजार ५३५ सक्रिय खाटांपैकी ५५४ खाटा भरलेल्या आहेत.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले, मोठ्या प्रमाणात रुग्ण घरी उपचार घेत आहेत. कारण, त्यांना लक्षणे नाहीत आणि त्यांना रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची गरज नाही. सध्या इमारतींतील लोकांची संख्या वाढत आहे, ते घरी राहून त्यांच्यावर उपचार करण्याचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे, रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी असून, रुग्णालयांतील गर्दी कमी आहे. वॉर्डस्तरीय वॉर रूममधील डॉक्टर होम क्वारंटाईनमध्ये असणाऱ्या रुग्णांचा पाठपुरावा करतात. बरेच रुग्ण त्यांच्या डॉक्टरांचा सल्लाही घेतात, शहरात सध्या ४७० गंभीर रुग्ण आहेत.