जमात-ए-इस्लामी हिंदची देशभरात विशेष मोहीम,‘स्ट्राँग फॅमिली स्ट्राँग सोसायटी’ उपक्रमाने आपलेसे करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - समाजातील वाढता हिंसाचार, वादविवाद टाळून कौटुंबिक स्नेह, बंधुभाव वृद्धी करण्यासाठी जमात- ए-इस्लामी हिंद या संस्थेच्या महिला विभागाकडून पुढाकार घेऊन राज्यभरात विशेष मोहीम राबविली जात आहे. कौटुंबिक नातेसंबंध सदृढ करून समाजात एकोपा प्रस्थापित करण्यासाठी ‘स्ट्राँग फॅमिली स्ट्राँग सोसायटी’ ही संकल्पना राबविली जात आहे.
दहा दिवस चालणाऱ्या मोहिमेत प्रमुख शहरांत कार्यक्रम, परिसंवाद आयोजित करून त्याबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे, अशी माहिती संस्थेच्या महाराष्ट्र महिला सचिव साजिदा परवीन व मुंबई मेट्रोच्या महिला सचिव मुमताज नजीर यांनी दिली.
परवीन म्हणाल्या, ‘पालकांमधील विभक्ततेचा सर्वात वाईट परिणाम त्यांच्या मुलांवर होतो. जो निरोगी समाजासाठी फायदेशीर नाही. त्याला पायबंद घालण्यासाठी कुराणमधील शिकवण अंगीकारली पाहिजे. कारण त्यामध्ये कुटुंबाचे महत्त्व खूप तपशीलवारपणे विशद केले आहे.’ जफर अन्सारी म्हणाले,‘समाज आणि देशाच्या उन्नतीसाठी स्वत:ला तयार करून देशाची प्रतिष्ठा वाढविण्याच्या प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.’ उपाध्यक्ष मौलाना इलियास फलाही, सरचिटणीस सिद्दीकी नसीमुस व अलका नाईक यांनी मोहिमेबद्दल विशेष माहिती दिली.