Join us

शुभ वार्ता! कृषी पर्यटन व्यावसायिकांमध्ये वाढ; पर्यटकांच्या रुचीमुळे व्यवसायवृद्धीला संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:09 AM

मागील काही वर्षांपासून पर्यटनाच्या व्याख्या दिवसागणिक बदलत आहेत.

मुंबई : मागील काही वर्षांपासून पर्यटनाच्या व्याख्या दिवसागणिक बदलत आहेत. यात आता पर्यटन म्हणजे केवळ आराम नसून त्यानिमित्ताने वेगळ्या पद्धतीचे अनुभव घेण्यावर पर्यटकांचा अधिक कल आहे. याच धर्तीवर कृषी पर्यटन व्यावसायिकांमध्ये वाढ होत असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली आहे. 

पर्यटकांना मिळणारा ग्रामीण जीवनाचा अनुभव हा कृषी पर्यटनाच्या दृष्टीने अनेकानेक संधी निर्माण करणारा असल्याने ही वाढ होत असल्याचे पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील वर्षभरात दीड हजार कृषी पर्यटक व्यावसायिकांची नोंद झाल्याची माहिती पर्यटन संचालक डॉ. बी.एन. पाटील यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे, यंदा नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यातही याबाबतचे २५ हून अधिक प्रस्ताव आले असून यांची पडताळणी सुरु असल्याचेही सांगितले. कृषी पर्यटनाला मागील काही वर्षांत वलय प्राप्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.

अनेकदा शहराच्या रहाटगाड्यातून संपन्न अनुभव घेण्यासाठी शहरातील पर्यटक ग्रामीण भागाकडे वळतात. या पर्यटकांना ग्रामीण राहणीमान, खाद्यसंस्कृती, कला - वस्तू अन् उत्पादने, निसर्ग भ्रमण, वन भोजन, आकाश निरीक्षण, शेती करण्याचे प्रात्यक्षिक, सेंद्रिय शेती, पर्यावरणपूरक जीवनशैली असे वेगवेगळे अनुभव देता येतात. यामुळे कृषी पर्यटकांना व्यवसाय वाढीसाठी स्थानिकांना रोजगारासाठी प्रोत्साहन देता येते. एकूणच, या स्वरूपाचे पर्यटन हे येत्या काही वर्षांत अधिक व्यापक बनणार आहे. कारण आता पर्यटकही पर्यटनाकडे जबाबदारीने, अनुभव घेण्याच्या दृष्टिकोनातून तसेच स्वत्वाचा शोध घेण्याच्या दृष्टीने पाहतात, असे पाटील यांनी सांगितले. 

कृषी पर्यटनासाठी या तरतुदी महत्त्वाच्या :

 कृषी पर्यटन व्यवसायास शेतीपूरक व्यवसाय म्हणून मान्यता देण्यात येते. कृषी विभागाच्या योजना या कृषी पर्यटन केंद्रांना मंजूर करण्यात येतात. 

 कृषी पर्यटन केंद्र उपक्रमासाठी शेतजमिनीचा उपयोग किंवा वापर करण्यासाठी अकृषक वापर परवानगी घेण्याची गरज भासत नाही. कृषी पर्यटन केंद्र सुरू केल्यानंतर त्याची रीतसर नोंद सातबारा तसेच आठ-अ वर तलाठ्यामार्फत करण्यात येतो.

 कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी सहकारी, तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून अल्प व्याजदराने कर्ज देतात.  कृषी पर्यटन केंद्रांवर पर्यटकांना सोयीसुविधांसाठी केल्या जाणाऱ्या बांधकामास म्हणजेच राहण्याच्या खोल्या इ.साठी प्रमाणपत्र घेण्याची अट नसते.

 घरपट्टी घरगुती दराने आकारण्यात येते. तसेच, सेवाकर, व्यवसाय कर, करमणूक कर इ. करांपासून सुरुवातीची काही वर्षे सवलत देण्यात येते.

टॅग्स :मुंबईपर्यटन