Join us

आरे कॉलनी व सीप्झमध्ये बिबट्याचा वाढता वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 2:25 AM

अधिवास धोक्यात : आरे जंगल म्हणून घोषित करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी

मुंबई : आरे कॉलनी परिसरात गेल्या कित्येक वर्षांपासून बिबट्यांचा वावर आहे. परंतु आरेमध्ये भविष्यात येऊ घातलेल्या विकास प्रकल्पामधून वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यामुळे वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये भक्ष्यांच्या शोधात घुसत आहेत. परिणामी, मानव-वन्यजीव यांच्यातला संघर्ष वाढत आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरीतील सीप्झ एमआयडीसी विभागात बिबट्या शिरल्याची घटना घडली. तसेच आरे कॉलनीमध्येही पर्यावरणप्रेमींना बिबट्या दिसून आला. त्यामुळे आरे कॉलनी हा परिसर जंगल म्हणून घोषित करा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

सीप्झ एमआयडीसी भागात सीप्झ गेट क्रमांक १ समोरील वेरावली जलाशय व केंद्र शासनाच्या कार्यालयाच्या आवारात रविवारी (८ डिसेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास एका बिबट्याने श्वानावर हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती. या घटनेत कार्यालयाच्या आवारात तैनात असलेले सुरक्षारक्षक मंडळाचे सुरक्षारक्षक यांच्या सतर्कतेमुळे श्वानाचे प्राण वाचले. या घटनेमुळे सीप्झ परिसरामध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा वनविभागाने दिला आहे.

आरे कॉलनीमध्ये सोमवारी (२३ डिसेंबर) सकाळी साडेसहाच्या सुमारास युनिट १७ येथे काही पर्यावरणप्रेमींना बिबट्या दिसून आला. त्यामुळे वारंवार दिसणाºया वन्यजीवांच्या पुराव्यानंतर आरेतील प्रस्तावित प्रकल्प थांबविले गेले पाहिजेत; अन्यथा वन्यजीवांचा अधिवास धोक्यात येईल, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले आहे. ‘एक बीज, एक सावली’ मोहिमेंतर्गत आरेमधील आदिवासीपाड्यात झाडांची रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. तर मोहिमेतील पर्यावरणप्रेमी सचिन रहाटे, सुशांत बाली आणि सारंग खाडिलकर सोमवारी आरेमध्ये फिरत असताना त्यांना युनिट १७ जवळ बिबट्या निदर्शनास आला. बिबट्या आणि इतर वन्यजीव संवेदनशील असल्याने आरेतील प्रकल्पांना दुसरीकडे स्थलांतरित करून आरे जंगल घोषित करण्याची मागणी या वेळी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.जंगल कमी झाल्याचा फटका!सकाळच्या सुमारास रोपटे घेण्यासाठी गेलो असता तिथे एका आदिवासी घराजवळ बिबट्या दिसून आला. वन्यजीवांकडे मानव हा पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील मेट्रो प्रकल्पाबाबत पर्यावरणाच्या बाजूने चांगले निर्णय घेतले. परंतु आरे हे जंगल घोषित करण्यासाठी दिरंगाई का होतेय? जंगल कमी होऊ लागल्यानेच बिबटे मानवी वस्तीमध्ये येऊ लागले आहेत. - सुशांत बाली, पर्यावरणप्रेमी

टॅग्स :मुंबईबिबट्या