नर्सरीच्या जागेत ‘उगवली’ गोदामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2015 11:54 PM2015-04-29T23:54:21+5:302015-04-29T23:54:21+5:30

जुईनगरमध्ये नर्सरीसाठी देण्यात आलेल्या जागेवर म्हशींचा तबेला, माठ, पाण्याच्या टाक्यांचे गोडाऊन व इतर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत.

'Growth' warehouse in nursery space | नर्सरीच्या जागेत ‘उगवली’ गोदामे

नर्सरीच्या जागेत ‘उगवली’ गोदामे

Next

नवी मुंबई : जुईनगरमध्ये नर्सरीसाठी देण्यात आलेल्या जागेवर म्हशींचा तबेला, माठ, पाण्याच्या टाक्यांचे गोडाऊन व इतर व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखाली पक्की बांधकामेही करण्यात आली आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून याकडे सिडकोसह महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत.
नवी मुंबईमधील उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीखालील जागेवर अतिक्रमण होऊ नये यासाठी सिडकोने या जागा स्वयंसेवी संस्थांना नर्सरीसाठी दिल्या आहेत. रोप वाटिकेव्यतिरिक्त इतर कोणतेही काम या ठिकाणी करण्यात येऊ नये. व्यावसायिक वापर किंवा पक्के बांधकाम करण्यासही मनाई आहे. परंतु जुईनगर सेक्टर -२५मध्ये सर्व नर्सरीधारकांनी नियम धाब्यावर बसविले आहेत. येथील भारत सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या समोर विद्युतवाहिनीखाली दोन मोठे तबेले तयार करण्यात आले आहेत. परप्रांतीयांना भाड्याने ही जागा देण्यात आली आहे. तबेल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून त्याचा त्रास रहिवाशांना होत आहे. विद्युतवाहिनीखाली व्यवसाय करणे धोकादायक ठरू शकते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. तबेल्याच्या ठिकाणी एक मठ तयार करण्यात आला आहे. त्याच्या बाजूला असलेल्या नर्सरीमध्ये पाण्याच्या टाक्यांसाठी गोडाऊन करण्यात आले आहे. या गोडाऊनच्या बाजूला असलेल्या नर्सरीमध्ये पाण्याचे माठ तयार करण्याचा व्यवसाय सुरू आहे. याशिवाय आतमध्ये पक्की बांधकामे केली आहेत. पक्के बांधकाम करण्यास परवानगी नसतानाही संबंधितांनी अतिक्रमण केले आहे. काही नर्सरीचालकांनी गॅरेजसाठी या जागेचा वापर सुरू केला आहे.
उच्च दाब विद्युतवाहिनीखाली धार्मिक स्थळही तयार करण्यात आले आहे. भविष्यात याठिकाणी मोठी दुर्घटना होऊ शकते. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सर्व नर्सरींची पाहणी करून गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत. अल्पावधीत दोन तबेले तयार केले आहेत. वेळेत आवर घातला नाही तर अजून अतिक्रमण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडकोचे अधिकारी या अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करत आहेत. सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख अनिल पाटील यांच्याशी संपर्क साधला परंतु संपर्क होऊ शकला नाही.

च्पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त सुभाष गायकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, या ठिकाणी पाहणी केली जाईल. जर कोणी अनधिकृत बांधकाम केले असेल तर, त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अतिक्रमणांना पाणीपुरवठा
येथील तबेल्यासह इतर ठिकाणीही पाणीपुरवठा करण्यात आला आहे. पाण्याचा गैरवापर सुरू आहे. तबेल्याजवळ पाण्यासाठी छोटा हौदही तयार केला आहे. पालिकेच्या पाण्याचा गैरवापर सुरू असून त्याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.

१रोपवाटिकेसाठी सिडकोने दिलेल्या जागेत प्रत्यक्षात मडके विक्रीचा स्टॉल थाटण्यात आला आहे.
२जुईनगरमधील नर्सरीत फुले फुलण्याऐवजी चक्क म्हशी बांधून ठेवल्या आहेत.
३जिथे रोपांची जोपासना व्हायला हवी, तिथे पाण्याच्या टाक्या ठेवल्या आहेत. जागेचा गैरवापर सर्वत्र होत आहे.

Web Title: 'Growth' warehouse in nursery space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.