मनिषा म्हात्रेमुंबई : जीएसटीचे सह आयुक्त राजेसाहेब माने (५५) बुधवारी दुपारपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री भायखळा पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियाच्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याप्रकरणी नोंद करत अधिक तपास सुरु आहे.
कांदिवली येथे राहात असलेले राजेसाहेब माने (५५) हे जीएसटी विभागात सह आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ते माझगाव येथील जीएसटी भवनमधील कार्यालयात हजर झाले. दुपारी पावणे दोनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडले. त्यानंतर ना ते कार्यालयात परतले. ना घरी पोहचले.माने यांचा संपर्क होत नसल्याने कुटुंबियांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते न सापडल्याने अखेर कुटुंबियांनी भायखळा पोलीस ठाणे गाठून माने हरवल्याची तक्रार दिली आहे. त्यांचे फ़ोटो सोशल मिडियावर व्हायरल करत त्यांच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास मुंबई पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकड़ून करण्यात येत आहे. दुपारी झूम मिटिंग झाल्यानंतर मोबाईल कार्यालयातच ठेवून ते निघून गेले. ते तणावात असल्याचीही माहिती समजते आहे. त्यानुसार, भायखळा पोलीस अधिक तपास करत आहेत.