मुंबई : जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत व्यापाऱ्याची ११ लाखांची रोकड घेऊन पसार झालेल्या चौकडीचा शोध घेण्यास लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांना यश आले आहे. तपासात माझगाव येथील राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयातील विक्रीकर निरीक्षकानेच यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करत ११ लाखांची रोकड जप्त केली आहे.
नागपाडा येथील लालचंद राजमल वानीगोता (६३) हे मालक जोईतकुमार जैन यांच्याकडे २२ वर्षापासून काम करतात. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. जैन यांच्या अनेक ठिकाणी इमारती असून त्या पगडी तत्त्वावर भाड्याने दिलेल्या आहेत. रूमचे भाडे गोळा करून कार्यालयात किंवा बँकेत जमा करतात.
दरम्यान १४ जून रोज़ी लालचंद हे कामगारासह कार्यालयात असताना चार जण धडकले. जीएसटी अधिकारी असल्याचे सांगत, कार्यालयात उपलब्ध असलेली रक्कम आणि हिशेबाच्या वह्या टेबलावर ठेवण्यास सांगितले. पुढे त्यातील ११ लाखांची रक्कम जमा करीत असल्याचे सांगून निघून गेले. ही बाब मालकाला समजताच त्यांना धक्का बसला. त्यांनी जीएसटी कार्यालयात चौकशी केली. अशी कुठलीही कारवाई केली नसल्याचे समजले. त्यांनी तात्काळ लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.
या तपासात माझगाव येथील राज्य वस्तू व सेवाकर कार्यालयातील विक्रीकर निरीक्षकाचा हात असल्याचे समोर आले. निरीक्षकाने बेकायदेशीररीत्या त्यावर डल्ला मारला आहे. त्यानुसार, पथकाने आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून ११ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.