जीएसटी दर आणखी कमी होण्याची शक्यता : अर्थमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:50 IST2025-03-09T06:50:34+5:302025-03-09T06:50:34+5:30
करांमध्ये समतोल साधण्याचे काम सुरू

जीएसटी दर आणखी कमी होण्याची शक्यता : अर्थमंत्री
मुंबई: जीएसटीचे दर आणखी कमी होण्याची शक्यता असून करांमध्ये समतोल साधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले.
त्यांनी सांगितले की, जीएसटी प्रणाली लागू करण्याच्या वेळी १ जुलै २०१७ रोजी रेव्हेन्यू न्यूट्रल रेट (आरएनआर) १५.८ टक्के होता तो २०२३मध्ये ११.४ टक्के झाला आहे. तो आणखी कमी होईल. एका पुरस्कार वितरण समारंभात सीतारामन म्हणाल्या की, करांमध्ये समतोल साधण्याचे काम सुरू आहे. शेअर बाजाराच्या चढ-उताराच्या कारणांविषयी आणि बाजाराच्या स्थिरतेविषयी त्या म्हणाल्या की, हा जर तर अशा स्वरुपाचा प्रश्न आहे. युद्धे संपतील का, तांबडा समुद्र सुरक्षित होईल का, चाचे यापुढे सक्रिय असणार नाहीत का या प्रश्नांवर जसे कोणीही कोणत्याही प्रकारचे उत्तर देऊ शकते तसेच शेअर बाजाराविषयी विचारलेल्या प्रश्नाचे स्वरूप आहे.