गणेशमूर्तींना जीएसटीचा ‘फटका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 05:19 AM2017-08-16T05:19:28+5:302017-08-18T14:49:45+5:30
गणेशमूर्तींवर जीएसटीचा परिणाम होऊन मूर्तींच्या किमती वाढल्या असल्याचे चित्र सध्या शहरातील सर्व मूर्ती कार्यशाळांमध्ये पाहायला मिळत आहे.
अक्षय चोरगे ।
मुंबई : गणेशमूर्तींवर जीएसटीचा परिणाम होऊन मूर्तींच्या किमती वाढल्या असल्याचे चित्र सध्या शहरातील सर्व मूर्ती कार्यशाळांमध्ये पाहायला मिळत आहे. मूर्तींवर जीएसटी लावलेला नसला तरी मूर्तींसाठी लागणारी माती, रंग, प्लास्टर आॅफ पॅरिस यांसारख्या कच्च्या मालांवर जीएसटी लागू झाला आहे. त्यामुळे एकंदरीत मूर्ती बनविण्याचा खर्च वाढतो. म्हणून मूर्तीच्या किमती वाढलेल्या आहेत, असे मूर्तिकार प्रदीप म्हादुसकर यांनी सांगितले.
दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढता आहे. वस्तूंच्या किमती वाढल्या वाहेत. तसेच मूर्तीसाठी लागणाºया कच्च्या मालाच्याही किमती वाढलेल्या आहेत. त्यात अधिक भर जीएसटीची, त्यामुळे स्वाभाविकच मूर्तींच्या किमती वाढणार होत्या, अशी ओरड मूर्ती विक्रेते आणि मूर्तिकारांकडून ऐकायला मिळत आहे. याउलट योग्य माहिती नसल्याने अनेक ग्राहकांना असे वाटत आहे की, वेगवेगळे कर बंद करून एकच जीएसटी लागू झाला आहे. तरीही मूर्तींच्या किमती का वाढल्या? पूर्वी रंगांवर साडेबारा आणि साडेतेरा टक्के असे दोन प्रकारचे २३ टक्के कर होते. आता रंगांवर फक्त १८ टक्के जीएसटी आहे; शिवाय मातीवर कर नाही तरीही मूर्तींच्या किमती का वाढविल्या आहेत, असा सवालही नागरिकांकडून विचारला जात आहे. यावर तज्ज्ञांनी सांगितले की, जीएसटी जरी कमी असला तरी कच्च्या मालावर व त्यापासून बनविलेल्या मूर्तीवरही जीएसटी लागू झाल्याने मूर्तींच्या किमती वाढल्या आहेत.
>पूर्वी कच्च्या मालावर कर भरले जात होते. हे कर मूर्तिकार भरत होता. मात्र आता कच्च्या मालासह मूर्तीवरही कर लादला गेला आहे. मूर्ती घडवल्यानंतर त्या मूर्तीवर १२ टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे मूर्तीच्या किमती दहा ते बारा टक्के वाढत आहेत.
- प्रफुल्ल छाजेड (सीए)
मूर्ती तयार केल्यानंतर मूर्तीवर जीएसटी लागू होतो. पूर्वी फक्त कच्च्या मालावर कर लागत होते. पूर्वी दोन कर होते. आता फक्त एकच जीएसटी लागू झाल्याने लोकांना असे अपेक्षित आहे की, मूर्तीच्या किमती कमी होतील. परंतु आता मूर्तीसाठी वापरल्या जाणाºया कच्च्या मालावर जीएसटी लागू होतो व मूर्ती तयार झाल्यानंतर त्यावरही जीएसटी लागू होतो. त्यामुळे काही प्रमाणात मूर्तीच्या किमती वाढणे अपेक्षित आहे. - रमेश प्रभू (कर अभ्यासक)