‘झाडे जगविण्याची हमी द्या; मोफत रोपटी मिळवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 03:43 AM2018-07-01T03:43:20+5:302018-07-01T03:43:28+5:30
पायाभूत प्रकल्प आणि विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने, मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे.
मुंबई : पायाभूत प्रकल्प आणि विकास कामांत अडथळा ठरणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. यामुळे पर्यावरणाचा ºहास होत असल्याने, मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात झाडे लावण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. त्यानुसार, सोसायटींच्या आवारात, शाळा-महाविद्यालये-व्यवसायिक आस्थापने अशा खासगी परिसरात पुढच्या महिन्यात २५ हजार देशी झाडांची रोपटी नागरिकांना विनामूल्य देण्यात येणार आहेत. ही झाडे जगविण्याची हमी संबंधितांना द्यावी लागणार आहे.
मुंबईतील पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार, खासगी परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाद्वारे १ ते ३१ जुलै २०१८ या एक महिन्याच्या कालावधीत वेगवेगळ्या देशी प्रजातींच्या झाडांची २५ हजार झाडे विनामूल्य देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मात्र, या प्रकारे विनामूल्य रोपटी घेताना ती झाडे जगविण्याची हमी संबंधित नागरिकांना घ्यावी लागणार आहे, अशी अटचे महापालिकेने घातली आहे.
महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांमध्ये प्रत्येकी एक हजार, याप्रमाणे एकूण २४ हजार रोपट्यांची व्यवस्था यापूर्वीच करण्यात आली आहे, तर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, अर्थात राणीच्या बागेतील मुख्य नर्सरीमध्ये एक हजार रोपटी आहेत. यानुसार, एकूण २५ हजार रोपटी विनामूल्य वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाच्या उद्यान अधिकाºयांचा समन्वय अधिकारीही नेमला आहे. या रोपट्यांव्यतिरिक्त १० हजार रोपटी उद्यान खात्याद्वारे महापालिकेच्या अखत्यारीतील परिसरांमध्ये लावण्यात येणार आहेत.
या रोपट्यांचा समावेश
खासगी व महापालिका परिसरात झाडे लावताना मुंबईच्या स्थानिक पर्यावरणाला अनुकूल ठरतील, अशाच प्रकारची झाडे प्राधान्याने लावण्यात येणार आहेत.
यामध्ये तामण, समुद्रफूल, शेवर, काशिद, कारंज, जंगली बदाम, आवळा, नागकेशर, कमंडलू, बकुळ, अर्जुन, पुत्रंजीव, रोहितक, बहावा (अमलताश), पेल्टोफोरम, कडुनिंब, सीता अशोक, सुरु, पिंपळ यांसारख्या झाडांच्या रोपट्यांचा समावेश आहे.
येथे मिळतील रोपटी
१ ते ३१ जुलै २०१८ दरम्यान ज्यांना आपल्या खासगी परिसरात वृक्षारोपण करायचे आहे, त्यांनी विनामूल्य रोपटी घेण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयातील उद्यान खात्याशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.