लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देवनार येथील कचराभूमीवर रात्रीच्या वेळी गुंडांचा मुक्तसंचार असतो. कचरावेचक अनेकवेळा कचऱ्याला आग लावतात. मात्र कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे सुरक्षा यंत्रणाही तेथे फार काळ थांबू शकत नाही. त्यामुळे यावर कायमचा तोडगा म्हणून कचराभूमीवर हायमास्ट दिवे लावले जाणार आहेत. यासाठी महापालिका ९८.२६ कोटी रुपये वर्षाला खर्च करणार आहे. गोवंडी मानखुर्द येथील देवनार कचराभूमीवर सध्या ३२०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. दिवस-रात्र हे काम सुरू असते. कचराभूमीमध्ये कचऱ्याचा धंदा करणारे माफिया तयार झाले आहेत. हे माफिया व त्यांचे गुंड अंधाराचा फायदा घेत या ठिकाणी प्रवेश करतात. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास अडथळा निर्माण होत असतो. त्यामुळे कचराभूमीची सुरक्षितता लक्षात घेऊन महापालिकेने येथे हायमास्टचे दिवे लावण्याचा निर्णय घेतला आहे. भाडेतत्त्वावर हायमास्ट दिवे लावण्यासाठी मल्हार हायरिंग सर्विसेस या कंत्राटदाराला वर्षभरासाठी ९८.२६ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. हा कंत्राटदार क्षेपणभूमीवर आठ हायमास्ट दिवे लावणार आहे. या दिव्यांसाठी दिवसाचा खर्च १२.५० लाख रुपये येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
कचराभूमीवर हायमास्ट दिव्यांचा पहारा
By admin | Published: May 25, 2017 12:46 AM