Join us

तळोजा कारागृहातील रक्षक, कैदी कोरोनामुळे धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:06 AM

दुर्लक्षाबाबत चौकशीची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तळोजा कारागृहात कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. २३१ ...

दुर्लक्षाबाबत चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : तळोजा कारागृहात कोरोना विषाणूचा फैलाव होत आहे. २३१ कर्मचाऱ्यांपैकी ११० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यात एकूण ५१ कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी याप्रकरणी उपरोक्त मंत्र्यांसह आरोग्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक (तुरुंग) सुनील रामानंद यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळोजा कारागृहात कैद्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक कैद्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असूनही प्रशासन त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तुरुंगात कैद्यांची कोरोना चाचणीच केली जात नाही. याठिकाणी फक्त तीन बीएएमएस डॉक्टर आहे. एमबीबीएस डॉक्टर नसल्याने व्यवस्थित उपचार होत नाहीत.

गेल्यावर्षी तळोजा तुरुंगात चार कैद्यांनी आत्महत्या केली होती. ३० एप्रिलला विशाल दसरी नावाच्या कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला शेवटच्या क्षणी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने त्याची दखल घेत तळोजा तुरुंगाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शकील अहमद यांनी केली आहे.

तळोजा तुरुंगात ४५ वयाच्या वर एकूण ३२१ कैदी आहेत. त्यात फक्त ४४ कैद्यांचे लसीकरण झाले आहे. तसेच तळोजा जेलच्या कैद्यांची क्षमता २१२४ आहे. मात्र, आजही एकूण ३२५१ कैदी ठेवण्यात आले आहेत. पाणीटंचाई व इतर सुविधांच्या अभावामुळे कैदी त्रस्त होत आहेत. हे मानव अधिकाराचे उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, याबाबत तळोजा कारागृहाचे अधीक्षक कुर्लेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही, त्यांचा मोबाईल बंद होता. कार्यालयात फोन केला असता रक्षक पाटील यांनी साहेब राऊंडला गेले आहेत, किती वेळ लागेल, कधी येतील सांगू शकत नाही, असे सांगितले.

................................

...................................................