पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईतील लसीकरणाचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:06 AM2021-06-01T04:06:53+5:302021-06-01T04:06:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण गतिमान करण्याच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे ...

Guardian Minister Aditya Thackeray reviewed the vaccination in Mumbai | पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईतील लसीकरणाचा आढावा

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला मुंबईतील लसीकरणाचा आढावा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहरातील कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण गतिमान करण्याच्या अनुषंगाने मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेऊन चर्चा केली. लसींची उपलब्धता, तसेच शहरातील लसीकरण गतिमान करण्याच्या अनुषंगाने काय काय उपाययोजना करता येतील यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.

महापालिका मुख्यालयात झालेल्या या चर्चेवेळी महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि सुरेश काकाणी उपस्थित होते. जास्तीत जास्त लोकसंख्या लसीकरणाखाली आणल्यानंतर कोरोनाची साथ लवकरात लवकर आटोक्यात आणण्यात यश येऊ शकेल. त्यामुळे लसींची उपलब्धता आणि लसीकरणाला गती देणे आवश्यक आहे. यादृष्टीने व्यापक असा आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या.

परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाबाबतही यावेळी चर्चा झाली. या विद्यार्थ्यांना कोविशिल्ड लस आवश्यक असून या लसीसाठी दोन डोसमधील अंतर जास्त आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पहिला डोस मिळूनही दुसऱ्या डोससाठी किमान ८४ दिवस थांबावे लागत असल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी दोन डोसमधील गॅप कमी करता येऊ शकेल का, याबाबत यावेळी चर्चा झाली. यासंदर्भात केंद्र शासनाशी संपर्क साधून चर्चा करण्यात येत आहे, असे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, या पद्धतीने त्यांच्या लसीकरणास चालना द्यावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

.........................................

Web Title: Guardian Minister Aditya Thackeray reviewed the vaccination in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.