Join us  

मोदी सरकारवर पालकमंत्री अस्लम शेख यांचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मोदी सरकारचा अस्त आता समीप आला आहे, असा घणाघात मुंबई शहरचे पालकमंत्री व कॉँग्रेस ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मोदी सरकारचा अस्त आता समीप आला आहे, असा घणाघात मुंबई शहरचे पालकमंत्री व कॉँग्रेस नेते अस्लम शेख यांनी मोदी सरकारवर केला आहे. इंधन दरवाढी विरोधात मालाड-मालवणी येथे आयोजित भव्य पदयात्रेनंतरच्या सभेत ते बोलत होते.

दिवसागणिक वाढत चाललेली महागाई, पेट्रोल डिझेलचे गगनाला भिडणारे भाव, अतिदक्षता विभागात दाखल झालेला जीडीपी, शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कृषी कायद्याबाबत जाब विचारण्यासाठी काॅँग्रेस मालाड (प.) विधानसभा क्षेत्राच्या वतीने सदर पदयात्रा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. मालवणी-अंबोजवाडी येथे या पदयात्रेचे रुपांतर मोठ्या जाहीर सभेत झाले.

यावेळी अस्लम शेख व मुंबई काॅँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर हल्ला चढवला. काॅँग्रेसचे हजारो कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी या रॅलीमध्ये सहभागी होत मोदी सरकार विरोधातल्या घोषणांनी आसमंत दणाणून सोडला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश सत्तेविरोधात निकराचा लढा काॅँग्रेस कार्यकर्त्यांनी दिला होता. आज त्याच प्रकारचा संघर्ष काॅँग्रेस कार्यकर्त्यांकडून अभिप्रेत आहे, असे आवाहन शेख यांनी भाषणाच्या शेवटी काॅँग्रेस कार्यकर्त्यांना केले.

काॅँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी आपल्या भाषणात शेतकरी आंदोलनावर भाष्य करताना काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकविणारा शेतकरी मोदी सरकारला त्याच मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगत देशाला सांप्रदायिक शक्तींपासून काॅँग्रेसचे धर्मनिरपेक्ष विचारच वाचवू शकतात असे प्रतिपादन केले.

मंगलप्रभात लोढा यांचा घेतला समाचार

अस्लम शेख यांनी भाषणात भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा समाचार घेतला. काही दिवसांपूर्वी भाजपचे मुंबई अध्यक्ष लोढा यांनी मालवणी परिसराचा दौरा करुन मालवणीत हिंदू व दलितांवरती अत्याचार होत आहेत असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा समाचार घेताना ते म्हणाले की, सर्व जाती-धर्मांचे लोक या मालवणीत गेल्या अनेक वर्षांपासून गुण्या गोविंदाने नांदत आहेत. ही मालवणी म्हणजे हिंदुस्थान आहे. पण काही मालवणीत येऊन येथील धार्मिक सलोखा बिघडवू पाहत आहेत,अशा लोकांना कायद्याच्या भाषेत उत्तर द्यायला आपण सक्षम असल्याचे त्यांनी शेवटी स्पष्ट केले.

---------------------------------------