भाजपची मागणी; सरकारी अधिकाऱ्यांवरही कारवाई करा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालाड मालवणी परिसरात सरकारी भूखंड बळकावून त्यावर अनधिकृत बांधकाम उभारण्याचा पॅटर्न राजरोस सुरू आहे. इथे उभारलेल्या अवैध बांधकामांमुळे दरवर्षी अपघात होतात आणि लोक मृत्युमुखी पडतात. बुधवारी रात्री बांधकाम कोसळून झालेल्या दुर्घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत स्थानिक आमदार आणि मंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपने केली आहे.
मालवणीच्या दुर्घटनेनंतर मंत्री अस्लम शेख यांनी या दुर्घटनेचे खापर अतिवृष्टीवर फोडले. मात्र, अतिवृष्टी दरवर्षी होते. त्याच पद्धतीने दरवर्षी दोन, चार अनधिकृत इमारती कोसळल्याने नागरिकांचा हकनाक मृत्यू होतो, असा आरोप भाजपचे पालिकेतील गटनेते विनोद मिश्रा यांनी केला. यामागे मालवणीतील अवैध बांधकामांचा विकास पॅटर्नच जबाबदार आहे. प्रशासन आणि सत्ताधारी नेत्यांच्या मिलीभगतमुळेच अवैध बांधकामे बांधण्याचा सपाटा सुरू असून, त्यामुळे दरवर्षी सामान्य नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला.
मालाड दुर्घटनेप्रकरणी केवळ कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून विषय संपणार नाही. तर, पालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करावी. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
..........................................