चेंबूरमधील मृत मुलीच्या कुटुंबाला न्याय देणार - पालकमंत्री मंगलप्रभात लोढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2022 03:50 PM2022-10-01T15:50:09+5:302022-10-01T15:50:32+5:30
हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे असं पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले.
मुंबई - मी कधी अशी घटना पाहिली नाही. निर्दयीरित्या मुलीला मारहाण करण्यात आले. मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही असं कुटुंबाचं म्हणणं आहे. त्यासाठी आज मी कुटुंबाची भेट घेतली. या प्रकरणात अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. आम्ही पीडित कुटुंबाच्या पाठिशी आहोत असं सांगत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी चेंबूर येथे झालेल्या मुलीच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
मंगलप्रभात लोढा म्हणाले की, हे प्रकरण लव्ह जिहाद की फसवणूक करून जिहाद झालंय हे माहिती नाही. रुपालीच्या कुटुंबाला मी भेटायला गेलो होतो. हे प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे अशी कुटुंबाची मागणी आहे. या मुलीवर दीड वर्षापासून अत्याचार सुरू होता. तिने याआधीही पोलीस तक्रार केली होती. त्यावेळी कारवाई झाली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत मी जेव्हा या कुटुंबाला भेटायला गेलो तेव्हा काहींनी तुम्ही लोढा यांना इथं का आणलं असा जाब माझ्यासोबत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना विचारला. या प्रकरणी सर्वांनी विनंती शांतता राखा. एका मुलीवर अत्याचार झाला ही निंदणीय बाब आहे. या विषयावर कुणी काहीही बोलत नाही. या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दोषींवर योग्य कारवाई करून यापुढे अशा घटना होणार नाहीत यासाठी काळजी घेतली पाहिजे असंही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं.
चेंबूर येथील रुपाली चंदनशिवे या तरुणीची निर्घृण हत्या झाली, यासंबधित आज घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली.
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) October 1, 2022
साधारण परिवारातील साधारण मुलगी आहे, असे समजून कोणी अत्याचार करू नये!
सरकार पीडितेच्या पाठीशी उभे आहे!
रुपाली व कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ!@mieknathshinde@Dev_Fadnavispic.twitter.com/HJgJTq10s7
काय आहे प्रकरण?
काही दिवसांपूर्वी बुरखा घालण्यास नकार दिला म्हणून तरूणीची हत्या करण्यात आली होती. हिंदू तरूणीने ३ वर्षांपूर्वी एका मुस्लीम तरूणाशी विवाह केला होता. दोघांचाही धर्म वेगवेगळा असल्यामुळे त्यांच्या प्रेमात धर्म आडवा येणार नाही, हे लग्नाच्या वेळीच ठरले होते. मुलगी हिंदू आणि मुलगा मुस्लिम पण काळानुसार सगळे काही बदलत गेले. मुलीवर मुस्लिम प्रथा अंगीकारण्यासाठी दबाव आणला जात होता. मात्र मुलीने या सगळ्याला नकार दिला असता तिची हत्या करण्यात आली. रुपाली असे मृत तरूणीचे नाव असून तिचा पती इक्बाल महमूद शेख याने भरदिवसा तिची हत्या केली. ही घटना मुंबईतील चेंबूर भागातील आहे. पोलिसांनी इक्बालला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.