लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या लसीकरण सुरू असलेल्या केंद्रांवर कार्यालय किंवा इतर कोणत्याही प्रकारचे उपक्रम सुरू ठेवू नयेत, संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक व्यवस्था उभारण्याच्या सूचना मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख आणि उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज पालकमंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. विशेषतः तौक्ते वादळामुळे झालेले नुकसान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, शहरामध्ये सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण याबरोबरच पावसाळापूर्व करावयाची विविध कामे यांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांच्यासह मुंबई महापालिकेच्या विविध झोनचे उपायुक्त, महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे यांनी, शहरामध्ये मान्सूनपूर्व कामांची पूर्तता जलद गतीने करण्यात यावी, विशेषतः जिथे पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत तेथील राडारोडा हलविणे आदी कार्यवाही करण्याची सूचना केली. कोस्टल रोड किंवा मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात कुठे पाणी साचणार असेल तर अशा ठिकाणी पाणी साचू नये यासाठीची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर कोरोनाविषयक मदतीसाठी शहरात प्रत्येक वॉर्डकरिता सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकांना त्या त्या ठिकाणी व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिल्या.