मुंबई :
दादर रेल्वेस्थानकाला फेरीवाल्यांचा विळखा कायमच असतो. मात्र, हा विळखा सैल करण्यासाठी मुंबई महापालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असतानाच शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिवाळीचे चार दिवस कारवाई केली जाणार नसल्याचा दिलासा फेरीवाल्यांना दिला आहे. मात्र, दिवाळी झाल्यावर पाडव्यानंतर फेरीवाल्यांना पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
दादर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेला दादासाहेब फाळके मार्गावर फेरीवाल्यांची संख्या कमालीची वाढली आहे. कैलास लस्सीपासून थेट शिवनेरी इमारतीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा रस्ता अडवून फेरीवाले बसलेले असतात. तसेच चित्रा चित्रपटगृहाजवळ पाणीपुरीवाला, महिलांचे सामान विक्री करणारेही असतात. त्यामुळे स्थानिकांना त्रास तर होतोच, शिवाय रस्त्यावरून चालतानाही अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत जवळपास ६९ फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई झाली आहे. मात्र, पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर या कारवाईला निश्चित खीळ बसणार आहे.
दादरला सूट का ? मुंबईतील रस्ते आणि पदपथांना अतिक्रमणांचा विळखा बसला आहे. अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जाते. कारवाईनंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ होते. दादर, चेंबूर, विलेपार्ले, परळ, गोरेगाव, कांदिवली भागांत फेरीवाल्यांविरोधात स्थानिकांकडून अनेक तक्रारी महापालिकेकडे येत आहेत. मग फक्त दादरमधील फेरीवाल्यांना अभय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणाहून आपल्याकडे विनंती अली, त्या ठिकाणी आपण सूट दिल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
फेरीवाल्यांचे दादर स्थानकासमोर आंदोलनऐन दिवाळीत पोलिस आणि महापालिकेकडून सुरू असलेल्या कारवाईचा निषेध म्हणून सर्व फेरीवाल्यांनी दादर रेल्वेस्थानकासमोर तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. अखेर सर्व सूत्रे हलल्यानंतर दिवाळीपर्यंत या फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास परवानगी दिली जावी, असा तोडगा काढण्यात आल्यानंतर या फेरीवाल्यांनी आंदोलन मागे घेतले. महापालिका आणि पोलिसांना कारवाई करायची होती, तर त्यांनी महिनाभरापासून हे सत्र सुरू करायचे होते. आम्ही दिवाळीसाठी कोणत्याही प्रकारचे सामान घेतले नसते, अशी प्रतिक्रिया फेरीवाल्यांनी व्यक्त केली. तर माणुसकीच्या दृष्टिकोनातून विचार करीत आपण पाडव्यापर्यंत या फेरीवाल्यांना सूट दिल्याचे दीपक केसरकर म्हणाले. नियम काय सांगतो ? रेल्वेस्थानकापासून दीडशे मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांनी बसू नये, असा आदेश न्यायालयाने दिलेला आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणातही हे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, अद्याप कोणत्याही स्थानकाबाहेर या निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही. विशेष म्हणजे १५० मीटर परिसर नेमका कुठे आहे, याची माहिती सर्वसामान्य प्रवाशांना तसेच अनधिकृत फेरीवाल्यांना मिळावी यासाठी रंगीत पट्टे रस्त्यावर रंगविण्यात आले होते. सध्या हे पट्टेही अनधिकृत फेरीवाल्यांच्या व्यवसायाखाली झाकले गेले आहेत.