Join us

मुंबई महापालिकेत पालकमंत्र्यांचे कार्यालय; काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 8:16 AM

या मुद्द्यावर आक्रमक होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला.

मुंबई :मुंबई महापालिका मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या कार्यालयावरून विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी प्रचंड गदारोळ केला. ही बाब स्वायत्त संस्थेवर अतिक्रमण असल्याचा मुद्दा काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला. पालकमंत्र्यांच्या या कार्यालयात भाजपचे माजी नगरसेवक बसणार असून त्याची यादी जाहीर करण्यात आल्याचे सांगत हा पायंडा चुकीचा असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. हा मुद्दा विधानसभेत आला तेव्हा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार काहीही न बोलता सभागृहाच्या बाहेर निघून गेले.

जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त अशा शासकीय कार्यालयात पालकमंत्री कार्यालय करू शकतात. मात्र महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा या स्वायत्त संस्था आहेत. इथे पालकमंत्र्यांच्या कार्यालयात माजी नगरसेवकांना बसायला सांगितले आहे. यातून तिथे राजकारण होत असून व्यवस्थेची मोडतोड करण्याचे काम होत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. या मुद्द्यावर आक्रमक होत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी सभात्याग केला.

कार्यालय देणे चुकीचे नाही : विखे पाटील 

भाजपकडून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या कार्यालयाचे समर्थन करत काँग्रेसच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यात आक्षेप असण्यासारखे काही नाही. त्या जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते. योग्य समन्वयासाठी पालकमंत्र्यांना महापालिकेत कार्यालय देणे चुकीचे नाही, अशी भूमिका विखे-पाटील यांनी मांडली. तर संवाद साधण्यासाठी पालकमंत्र्यांना कार्यालय दिले असेल तर त्यात हरकत कशाला हवी, असा प्रश्न मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना विचारला.

टॅग्स :मुंबईमहाराष्ट्र