मुंबई : मालाड पूर्वेकडील एका खासगी शाळेत दरवर्षी होत असलेल्या शुल्कवाढीमुळे पालक त्रस्त झाले आहेत. के.जी.मधून पहिली इयत्तेत प्रवेश घेताना करण्यात येणारी शुल्कवाढ ही अतिरिक्त असून, त्या प्रमाणात शाळेत पायाभूत सुविधाही पुरवल्या जात नाहीत. शाळेच्या अन्य शाखांमध्ये शुल्क कमी असून, याच शाळेच्या शाखेचे शुल्क वाढवत असल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. मात्र, या आरोपाचे खंडन शाळा प्रशासनाने केले आहे. मालाड पूर्व येथील विबग्योर शाळेत मोठ्या शिशूतून इयत्ता पहिलीत प्रवेश घेण्यासाठी जानेवारीत आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू केली होती. त्या वेळी पालकांना शुल्काविषयी माहिती देण्यात आली नव्हती. शाळा गेल्या चार ते पाच वर्षांपासून शुल्कात वाढ करत आहे. पण शाळा प्रशासनाकडून एसी क्लासरूम, वाचनालय आणि कॉम्प्युटर रूम या सुविधा मुलांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्याचबरोबर आॅडिटोरियमदेखील नाही. शाळेच्या अन्य शाखांमध्ये शुल्क कमी आहे. मालाड पूर्वच्या शाखेतून अधिक शुल्क घेतले जाते, पण सुविधा देत नाहीत. यामुळे पालकांची आर्थिक कोंडी झाली असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर पालकांनी सांगितले. मोठ्या शिशूत शाळा फक्त ३ तास असते, पण इयत्ता पहिलीची शाळा सात तास असते. त्यामुळे शुल्कवाढ अतिरिक्त नसून ती योग्य पद्धतीने करण्यात येते. जानेवारी महिन्यात पालकांचे ओरिएटेशन घेतले होते. शाळा चार मजल्यांची असून, महापालिकेकडून परवानगी मिळाली आहे. वर दोन मजले बांधल्यावर आॅडिटोरियम करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा पुरवण्यात येतात. प्रत्येक वर्षी ९ ते १० टक्केच शुल्कवाढ करण्यात येते. पण इयत्ता पहिलीत विषय वाढतात, शाळेचा वेळ वाढतो, त्यानुसारच शुल्क वाढविले जात असल्याचे शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष टिब्बवाल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मालाडच्या खासगी शाळेच्या शुल्कवाढीमुळे पालक त्रस्त
By admin | Published: March 21, 2017 2:29 AM