Join us

खंबीर नेतृत्वाअभावी पहारेकरी थंडावले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2020 1:01 AM

आक्रमक भूमिकेचा अभाव; दुसरा मोठा पक्ष असूनही धोरणसातत्याअभावी होतेय कोंडी

मुंबई : ‘आपला महापौर’ निवडून आणण्याचा निर्धार करत निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजपने स्वबळावर तिप्पट संख्याबळ मिळवले. मात्र सत्तेच्या रस्सीखेचीत सरशी शिवसेनेची झाली आणि भाजपचे स्वप्न भंग पावले. त्यानंतरही विरोधी बाकावर न बसता पहारेकऱ्यांची भूमिका बजाविणारा भाजप आक्रमक राहून शिवसेनेची कोंडी करेल, असे वाटत होते. परंतु, खंबीर नेतृत्वाअभावी पहारेकरी सध्या थंडावल्याचे चित्र मुंबई महापालिकेत दिसून येत आहे.महापालिकेवर दोन दशकांहून अधिक काळ शिवसेना आणि भाजपने सत्ता गाजवली. मात्र सत्तेत असूनही सेनेने भाजप नगरसेवकांना कोणतेही मोठे पद दिले नाही. एखाद्या वैधानिक समितीचे अध्यक्षपद किंवा विशेष समितीच्या अध्यक्षपदावरच भाजपची बोळवण करण्यात येत होती. त्यामुळे भाजपमध्ये असंतोष खदखदत होता. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत भाजपने ‘मिशन शंभर’ लक्ष्य ठेवून स्वबळावर निवडणूक लढविली. मोदी लाटेत भाजपचे तब्बल ८३ नगरसेवक निवडून आले. त्यामुळे महापौर आता भाजपचा असे वाटत असताना सत्ता बाजारात शिवसेनेने बाजी मारली. दुसरा मोठा पक्ष म्हणून महापालिकेचे विरोधी नेतेपद भाजपच्या वाट्याला येणार होते. मात्र विरोधी बाकावर न बसता पहारेकऱ्यांच्या भूमिकेतूनच शिवसेनेची कोंडी करण्याचे मनसुबे भाजपने आखले. तशी आक्रमकता पहिल्या वर्षी भाजप नगरसेवकांनी ठेवली. जवळपास समान संख्याबळ असल्याने भाजपने शिवसेनेच्या नाकात दम आणला होता.पालिकेची आर्थिक नाडी असलेले स्थायी समिती अध्यक्षपद शिवसेनेकडे आहे. मात्र समान संख्याबळामुळे कोणताही प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी भाजपची सहमती तेवढीच महत्त्वाची ठरत होती. त्यामुळे सत्ताधाºयांवर पहारेकरी यांनी आपली पकड घट्ट ठेवली होती. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदावर दावा करेल, असे अंदाज बांधले जात होते. मात्र चार महिने उलटले तरी भाजपने विरोधी पक्षनेतेपदात स्वारस्य दाखवलेले नाही. याउलट लोकसभा निवडणुकीत भाजपचे गटनेते मनोज कोटक यांना खासदारकीची लॉटरी लागली. त्यांच्या दिल्लीवारीनंतर नवीन गटनेत्याची नियुक्ती केली जाणार होती. परंतु, अद्याप भाजपच्या गोटात अशा कोणत्या हालचाली दिसून येत नाही. याचा पुरेपूर फायदा सत्ताधारी उठवताना दिसत आहेत. याची प्रचिती स्थायी समितीच्या गेल्या काही बैठकांमध्ये आली.भाजपचे आमदार आशिष शेलार यांचा एक प्रस्ताव शिवसेना - काँग्रेस - राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाने एकत्रित येऊन फेटाळला. वांद्रे येथील किल्ल्याच्या सुशोभिकरणासाठी शेलार आग्रही आहेत. याबाबत त्यांनी आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर तत्काळ प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र वांद्रेतील स्थानिक नगरसेवक काँग्रेसचे आसिफ झकेरिया यांनी आक्षेप घेतल्यानंतर हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी भाजप नगरसेवकांनी बराच युक्तिवाद केला. मात्र नव्याने जुळून आलेल्या मैत्रीसाठी शिवसेनेने प्रस्ताव बहुमताने फेटाळला. भाजपने देवनार येथील कचºयापासून वीजनिर्मिती प्रकल्पावरही आता आक्षेप घेतला आहे. मात्र स्थायी समितीमध्ये भाजपने मौन का बाळगले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.गटनेत्याच्या अनुपस्थितीत ज्येष्ठ नगरसेवकांचा प्रभाव नाहीभाजप पक्षाला नेहमीच चांगले वक्ते मिळाले आहेत. आक्रमकपणे भूमिका मांडणाºया नगरसेवकांची फळीही त्यांच्याकडे आहे. प्रत्येक वर्षी नवीन गटनेता नेमण्याचा भाजपचा शिरस्ता होता. यामुळे नवे नेतृत्व तयार होत होते. मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये भाजपने कोटक यांनाच गटनेतेपदी कायम ठेवले. त्यांच्या गैरहजेरीत काही ज्येष्ठ नगरसेवक पक्षाची भूमिका मांडताना दिसतात. पण तो प्रभाव दिसून येत नाही. त्यामुळे दुसरा मोठा पक्ष असूनही नेतृत्वाअभावी मुंबई महापालिकेत भाजप नगरसेवकांचीच कोंडी होताना दिसून येत आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाशिवसेनाभाजपा