मुंबईच्या फौजदारांना गावाकडचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 05:14 AM2018-04-24T05:14:19+5:302018-04-24T05:14:19+5:30
रिक्त पदे ठरत आहेत अडसर : बदलीसाठी शेकडो अर्ज आयुक्तालयात दाखल
राजेश निस्ताने ।
मुंबई : मुंबई महानगरीत कार्यरत असलेल्या शेकडो पोलीस अधिकाऱ्यांना ग्रामीण महाराष्टÑात बदलीचे वेध लागले आहेत. त्यासाठी अर्जही सादर केले आहेत; परंतु मुंबईतील रिक्त पदांचे कारण सांगून आयुक्तालयाने हे अर्ज पोलीस महासंचालकांकडे पाठविण्याऐवजी आपल्याकडेच ठेवल्याची माहिती आहे.
मुंबई शहरात फौजदार ते निरीक्षक दर्जाचे हजारो पोलीस अधिकारी कार्यरत आहेत. त्यातील बहुतेकांची नाळ अजूनही गावाशी जुळलेली आहे. अनेक वर्षे मुंबईत काढल्यानंतर आता उर्वरित काळ गावाकडे काढण्याची त्यांची इच्छा असते. निवास व्यवस्थेची अडचण, तासन्तासाचा प्रवास, कौटुंबिक जबाबदारी, ठाणेदार बनण्याची मनीषा, त्यासाठी ग्रामीणमध्ये असलेला भरपूर वाव आदी बाबींमुळे अनेक अधिकाºयांना मुंबई नकोशी झाली आहे. म्हणून हे अधिकारी आपल्या भागात बदलीसाठी अर्ज करतात.
१५ फेब्रुवारीची डेडलाइन उलटली
विदर्भ, मराठवाडा, कोकण, खान्देश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईत नेमणुकीस असलेल्या शेकडो पोलीस अधिकाºयांनी ग्रामीण महाराष्ट्रात बदली व्हावी म्हणून मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे अर्ज केले आहेत. नियमानुसार १५ फेब्रुवारीपूर्वी बदलीचे हे सर्व अर्ज आयुक्तालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठविणे बंधनकारक होते.
परंतु सामान्य बदल्या तोंडावर (३१ मे) येऊनही हे अर्ज अद्याप महासंचालकांकडे पाठविण्यात आलेले नाहीत. अनेक अधिकाºयांनी थेट महासंचालक कार्यालयाकडे बदली अर्जाची नोंद केली असली तरी हे अर्ज घटक प्रमुखामार्फत आलेले नसल्याने त्याचा विचार केला जाणार नसल्याचे महासंचालकांनी आधीच स्पष्ट केले आहे.
पुन्हा वर्षभराची प्रतीक्षा
मुंबई पोलीस आयुक्तालयात आधीच रिक्त असलेल्या पोलीस अधिकाºयांच्या जागा हे कारण त्यात अडसर ठरले आहे. अर्ज सादर करण्याची निर्धारित वेळ निघून गेल्याने शेकडो पोलीस अधिकाºयांना आता ग्रामीणमधील बदलीसाठी पुन्हा वर्षभर प्रतीक्षा
करावी लागण्याची चिन्हे आहेत.