मुंबई - मराठी माणसांचा नववर्ष दिन म्हणजे गुढी पाडवा. उद्या गुढीपाडवा अर्थात हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस साजरा होत आहे. हा दिवस आपण गुढी उभारून साजरा करतो. घरात पुरणाची पोळी, नवनवीन वस्तूंची खरेदी आणि आनंदाचे वातावरण असते. मात्र, यंदाच्या गुढी पाडव्यावर कोरोनाचं सावट आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सरकारने गुढी पाडवा कसा साजरा करावा, याबद्दल नियमावली जाहीर केली आहे.
राज्य सरकारने राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लादले आहेत. त्या, पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने बंद आहेत. त्यामुळे, कोरोनाचं सावट यंदाच्या गुढी पाडव्याच्या सणावरही आहे. त्यासाठीच, सरकारने गुढी पाडवा साजरा करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, कुठलिही मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली असून घरीच हा सण साजरा करण्याचे आवाहनही करण्यात आलंय.
नागरिकांनी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजण्यापूर्वीच गुढी पाडवा साजरा करावा.
अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो. विशेष म्हणजे पालखी, दिंडी, प्रभार फेरी, बाईक रॅली व मिरवणूक काढण्यात येतात. मात्र, यंदाच्या वर्षी या सर्वांनाच बंदी घालण्यात आली आहे.
सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये.
सोशल डिस्टन्स व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. गुढी पाडव्यादिवशी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत.
शासनाने कोविड 19 च्या अनुषंगाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे.
कशी उभारतात गुढी
चैत्र शुद्ध प्रतिपदा हा शालिवाहन शकाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा. या दिवशी कुटुंबातल्या सर्व स्त्री पुरूषांनी पहाटे उठून स्नान करावे. तत्पूर्वी घर स्वच्छ करावे. मुख्य प्रवेशद्वाराबाहेर रांगोळी काढावी. दाराला आंब्याच्या पानांचे व झेंडूच्या फुलांचे तोरण बांधावे. वडिलधाऱ्या व्यक्तीने घरातल्या देवांची मनोभावे पूजा करावी. आदल्या दिवशी विकत आणलेली वेळूची काठी आणून, ती धुवून तिच्या टोकाला धुतलेले स्वच्छ वस्त्र आणि सुवासिक पुâलांची माळ बांधून त्यावर चांदीचा गडू, लोटी किंवा फुलपात्र अडकवावे. नंतर सर्व कुटुंबीयांच्या उपस्थितीत गुढी उभारावी. धर्मशास्त्रात यालाच ब्रह्मध्वज अशी संज्ञा आहे.