मुंबई - गुढीपाडव्यानिमित्त उत्तर मुंबईत रविवारी काढण्यात आलेल्या नव वर्ष स्वागत यात्रांमध्ये नागरिकांसोबत केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल हेदेखील सहभागी झाले. त्यात कुठे ते लेझीम खेळले, तर कुठे ढोल वाजविण्यात तल्लीन झाले, कुठे झेंडा फडकवला, तर कुठे पालखी खांद्यावर घेतली आणि रथ ओढला. या सहभागामुळे नागरिक आणि कार्यकर्ते चांगलेच सुखावले होते.
सर्वप्रथम कांदिवली पश्चिमेकडील लोककल्याण कार्यालयात त्यांनी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले. यावेळी कार्यालयाबाहेर फुलांची सजावट आणि रांगोळी काढण्यात आली आहे. यावेळी माजी खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, मनीषा चौधरी, संजय उपाध्याय, जिल्हा अध्यक्ष गणेश खणकर, ज्येष्ठ नेते अँड. जे. पी. मिश्रा, विनोद शेलार, निखिल व्यास आदी उपस्थित होते. त्यानंतर चारकोप येथील सेक्टर नऊ येथील स्वागतयात्रेबरोबरच बोरीवली, दहिसर, मालाड येथील कार्यक्रमांतही ते सहभागी झाले. यावेळी मालाड येथील लिबर्टी गार्डनमधील स्वतंत्र उद्यानाचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.