मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी लोक सोने किंवा गृह खरेदीला प्राधान्य देतात. याचे औचित्य साधत आजच्या गुढीपाडव्याला सराफा बाजार तेजीत येईल, अशी आशा सराफा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. नोटाबंदी आणि जीएसटीचे परिणाम आता ओसरले असून, रविवारी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी होईल, असे सराफा व्यापा-यांचे म्हणणे असून, गृहखरेदीला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.लागू बंधू ज्वेलर्सचे दिलीप लागू यांनी सांगितले, नोटाबंदी आणि जीएसटीमुळे सराफा बाजार मोठ्या प्रमाणात थंडावला होता. परंतु, आता बाजार उभारी घेत आहे. गुढीपाडव्यामुळे सराफा बाजार तेजीत येईल. देशभरात सोने खरेदीसाठी गुढीपाडव्यालाच अधिक पसंती असते. आम्हीदेखील ग्राहकांसाठी तयारी केलेली आहे.वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आशिष पेठे यांनी सांगितले, घाऊक बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ३० हजार ३०० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा किरकोळ बाजारातील दर २९ हजार ७०० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे. सोन्याची किंमत गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी यामध्ये फार काही फरक पडणार नाही. ग्राहकांसाठी सराफा बाजार सज्ज आहे. व्यवसाय खूप चांगला होईल.गुडविन ज्वेलर्सचे सुनील कुमार यांनी सांगितले, सोन्याची विक्री वाढत असून गुढीपाडव्याला सर्वोच्च विक्री होईल. सोन्यासोबतच हिरे, प्लॅटिनम आणि व्हाइट गोल्डची मागणी वाढली आहे. गुढीपाडव्यासाठी अनेक ग्राहकांनी अगोदरच बुकिंग केली आहे.गुढीपाडव्याच्या दिवशी कित्येक लोक मुलांच्या परीक्षा असल्या तरी खास घरे पाहण्यासाठी येतात. मागच्या वर्षीपेक्षा यंदा २० ते ३० टक्के व्यापार तेजीत आहे. ८० टक्के ग्राहक हे राहण्यासाठी घर खरेदी करतात, तर २० टक्के ग्राहक गुंतवणूक म्हणून घर खरेदी करतात.- अनिकेत हावरे, व्यवस्थापकीय संचालक, हावरे बिल्डर्समहारेरामुळे घरांच्या खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता आली आहे. गुढीपाडव्याला मोठ्या प्रमाणात लोक घर खरेदी करतात. अनेकांना या दिवशी गृहप्रवेश करायचा असतो. गुढीपाडव्यामुळे व्यवसायाला मोठी उभारी मिळेल, अशी आशा आहे.- निरंजन हिरानंदानी, राष्टÑीय अध्यक्ष, नरेडको
Gudi Padwa 2018 : गुढीपाडवा हा गृह, सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 2:59 AM