गुढीपाडव्याला सोने गेले उच्चांकावर! जाणून घ्या आजचा दर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 06:01 AM2019-04-06T06:01:39+5:302019-04-06T06:02:08+5:30
एका तोळ्यासाठी ३३,५०० रुपये
मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक तसेच हिंदू नववर्षाचा आरंभ असलेल्या गुढीपाडवा सणाला सोन्याच्या दराने प्रति तोळ्यासाठी ३३ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. सराफा बाजारात प्रति तोळा सोन्यासाठी शुक्रवारी वस्तू व सेवा करासह ३३ हजार ५०० रुपये मोजावे लागत होते. गेल्या १० वर्षांतही सोन्याचे दर इतक्या उच्चांकावर गेले नसल्याची माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव कुमार जैन यांनी दिली.
जैन यांनी सांगितले की, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला ग्राहक सोने खरेदीसाठी झवेरी बाजारासह अन्य बाजारपेठांत मोठी गर्दी करतात. गतवर्षी १८ मार्च २०१८ला गुढीपाडवा होता. त्या वेळी प्रति तोळा सोन्याचा दर ३० हजार २२४ रुपये होता. मात्र गेल्या वर्षभरात सातत्याने सोन्याचे दर वाढत असून, शुक्रवारी सोन्याचा प्रति तोळा दर ३२ हजार ५०० रुपये इतका होता. त्यावर सुमारे १ हजार रुपये वस्तू व सेवा कर आकारल्याने प्रति तोळा सोन्यासाठी ग्राहकांना ३३ हजार ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. सोन्याच्या दरात वाढ झाली असली, तरी खरेदीतील उत्साह मात्र तसूभरही कमी झाला नसल्याचे कुमार जैन यांनी स्पष्ट केले. परिणामी, महाराष्ट्रामध्ये या गुढीपाडव्याला सराफा बाजारांतील उलाढालीत १० टक्क्यांची वृद्धी दिसेल, अशी अपेक्षा सराफा बाजारातून व्यक्त होत आहे.
गेल्या ५ वर्षांत दर (प्रति तोळा)
वर्ष दर (रुपये)
१८ मार्च, २०१८ ३०,२२४
२९ मार्च, २०१७ २८,६५१
८ एप्रिल, २०१६ २८,९७४
२१ मार्च, २०१५ २६,१७०
३१ मार्च, २०१४ २८,५११