Join us

Tejas Thackeray: गुढीपाडवा शोभायात्रेत तेजस ठाकरेंचीच हवा; ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 4:09 PM

Tejas Thackeray: गिरगावातील शोभायात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र, तेजस ठाकरे यांच्या बॅनरची चर्चा जास्त रंगली होती.

Tejas Thackeray: मराठी नववर्षाला सुरुवात झाली असून, गुढीपाडवा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरात अनेक ठिकाणी शोभायात्रेच्या माध्यमातून संस्कृती व परंपरांचे दर्शन घडवण्यात आले. मुंबईतही शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले. मात्र, गिरगावमधील एका बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आणि या बॅनरमुळे उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. 

आताच्या घडीला ठाकरे गट कमालीचा अडचणीत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाकडे जाणे हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रचंड मोठा धक्का मानला जात आहे. यातच ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस आणखी तीव्र होताना दिसत आहे. आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणूक ठाकरे गटासाठी प्रचंड आव्हानात्मक असल्याचेही सांगितले जात आहे. यातच आता तेजस ठाकरे यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा जोर धरला आहे. 

तेजस ठाकरे यांच्या ‘त्या’ बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

उद्धव ठाकरे यांचे ज्येष्ठ पुत्र आदित्य ठाकरे हे सध्या राजकारणात सक्रिय आहेत. पण या सगळ्यापासून दूर असलेले तेजस ठाकरे हेही राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा अधूनमधून होत असतात. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासाठी हा काळ अत्यंत कसोटीचा आणि बिकट आहे. या संकट काळात वडिलांना साथ देण्यासाठी तेजस ठाकरे राजकारणात उतरणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा गिरगावातील बॅनर्समुळे रंगली आहे. मराठीबहुल वस्ती असलेल्या गिरगाव भागातील तेजस यांचे बॅनर लक्ष वेधून घेत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने या परिसरात आकर्षक मिरवणुका निघत असतात. गिरगावातील शोभायात्रेसाठी आलेल्या लोकांचे स्वागत करतानाचे तेजस ठाकरे यांचे बॅनर्स सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत. 

तेजस ठाकरे यांच्या बॅनर्सची जास्त चर्चा रंगली होती

गिरगावातील शोभायात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. मात्र, त्यांच्या उपस्थितीपेक्षा गिरगावात तेजस ठाकरे यांच्या बॅनर्सची जास्त चर्चा रंगली होती. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी गेल्य वर्षी तेजस यांच्या वाढदिवसानिमित्त सामना वृत्तपत्रात पहिल्या पानावर पूर्ण पान जाहिरात दिली होती. तेव्हापासूनच तेजस हे राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावेळीही तेजस ठाकरे यांचे राजकीय लॉचिंग होणार असल्याची चर्चा रंगली होती. दहीहंडी उत्सवाच्या काळातही गिरगावात तेजस ठाकरे यांचे बॅनर्स लागले होते. या बॅनर्सवर बाळासाहेब यांचा उल्लेख 'हिंदुहदयसम्राट', उद्धव ठाकरे यांचा उल्लेख 'कुटुंबप्रमुख' तर आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांचा उल्लेख अनुक्रमे 'युवानेतृत्त्व' आणि 'युवाशक्ती' असा करण्यात आला होता. तेजस ठाकरे यांच्या हातात युवासेनेची सूत्रे दिली जातील, असा अंदाज अनेकांना वर्तवण्यात आला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :तेजस ठाकरेउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेआदित्य ठाकरे