Join us

नियमांची गुढी आणि जबाबदारीचा पाडवा..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गुढीपाडव्याचा सण मराठी कलाकार दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गुढीपाडव्याचा सण मराठी कलाकार दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गुढीपाडव्यासह इतरही सण साजरे करण्यावर सावट आले आहे. गेल्यावर्षी तर गुढीपाडव्याला लॉकडाऊनच लागला होता. यंदा तसे नव्हते; मात्र तरीही यंदाचा गुढीपाडवा कलाकार मंडळींनी साधेपणाने साजरा केला. काही कलाकार शूटिंगमध्ये व्यस्त होते, तर अनेक कलावंतांनी गुढीपाडवा घरच्या घरी कुटुंबीयांसोबत आनंदाने साजरा केला. मात्र हे करताना संवेदनशील अशा कलाकारांच्या मनात बाहेरच्या प्रादुर्भावाची जाणीव प्रखर होती. उत्सवासोबतच सभोवतालचे भान कलाकारांच्या ठायी अचूक असल्याचेही यातून पुरेपूर स्पष्ट झाले. कोरोनाचे संकट लवकर टळू दे, अशी अपेक्षा व्यक्त करत कलाकार मंडळींनी यंदा गुढी उभारली.

चौकट :

विजय कदम (अभिनेता) :

गेल्यावर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी कडकडीत लॉकडाऊन पाळताना मनावर खूप दडपण होते. काय होणार, कसे होणार, असे प्रश्न होते. मात्र नंतर यातून हळूहळू सावरत गेलो. यंदाचा गुढीपाडवा तरी इतरांसोबत साजरा करता येईल असे वाटले होते. पण पुन्हा एकदा दुसरी लाट उसळली आहे. त्यामुळे प्रत्येकाने जर नियम पाळले तर यापुढे येणारे सण आपण आनंदाने, एकोप्याने आणि सर्वांच्या सोबत साजरे करू शकू. तमाम रसिकांना माझी हीच विनंती आहे, की नियम पाळू या आणि निरोगी आयुष्य जगूया.

दीप्ती भागवत (अभिनेत्री):-

सध्यातरी आपण घरी राहूनच सण साजरे करूया. अतिमहत्त्वाचे काम असेल आणि त्यासाठी बाहेर पडावे लागणार असेल, तर मास्क लावणे आवश्यकच आहे. सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम पाळणेही खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण सदैव सतर्क राहू या आणि कोरोना विषाणूचा संसर्ग टाळूया.

ज्ञानेश वाडेकर (अभिनेता) :-

सध्याच्या भीषण परिस्थितीत ऐकायचे कुणाचे आणि करायचे काय, हा प्रश्न पडला असताना गरज आहे ती आपला आतला आवाज ऐकण्याची! मात्र त्यासाठी अतिआवश्यक आहे ते आपल्याला माहिती पुरवणारे स्रोत खात्रीलायक, अभ्यासू आणि ज्ञानी असण्याची ! या काळात आत्मज्ञानाची गुढी उभारण्याची जास्त आवश्यकता आहे. बाहेरचा कोरोना कधी संपेल माहीत नाही; परंतु आपल्या आतमध्ये आपण असे पावित्र्य आणि ज्ञान निर्माण करू, की आपण या आपत्तीला किंचितही न घाबरता त्याचा सामना निर्विघ्नपणे करू शकू.

वंदना गुप्ते (अभिनेत्री):-

बाहेरची परिस्थिती अजून बदललेली नसताना, लोक इतक्या बेफिकीरपणे का वागत आहेत, असा मला प्रश्न पडला आहे. बाजारात वगैरे होणारी गर्दी पाहून तर मला धक्काच बसतो. सर्वांनी काटेकोरपणे मास्कचा वापर केला तर कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण आणता येईल, याची जाणीव असायला हवी. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ही आजची गरज आहे. मी उभारलेल्या गुढीतून मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.