Join us

मुंबईत गुढीपाडवा साधेपणाने साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी यंदा अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. शोभायात्रा, ...

मुंबई : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईकरांनी यंदा अत्यंत साधेपणाने गुढीपाडवा साजरा केला. शोभायात्रा, चित्ररथ, ढोल-ताशा पथकांनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही आपल्या उत्साहाला आवर घालत समाजोपयोगी उपक्रम राबविले.

गिरगाव, लालबाग, परळ, दादर, कुर्ला, बोरिवली परिसरात भव्य शोभायात्रांचे आयोजन करणाऱ्या मंडळांनी यंदा त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि परिसरातील नागरिकांना डिजिटल गुढी उभारण्याचे आवाहन केले होते. त्याचप्रमाणे घरातच राहून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारला सहकार्य करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुंबईकरांनी आपल्या घरात गुढी उभारून कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचा संकल्प केला.

नववर्षावर कोरोनाचे सावट असले तरी मुंबईकरांनी त्याच्या स्वागतात कोणतीही कसूर सोडली नाही. दारावर तोरणे, रांगोळ्या, झेंडूच्या माळा आणि बाल्कनीत गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. घराघरात पुरणपोळी, श्रीखंड-पुरी, खीर अशा मिष्टान्नासह पंचपक्वानाचा बेत करण्यात आला होता. घरातील सभासदांनी पाडव्यानिमित्त एकत्र भोजनग्रहण करीत आनंदोत्सव साजरा केला.

दुसरीकडे अनेक मंडळांनी कोरोना प्रतिबंधक नियम पाळून रक्तदान शिबिर, अन्नवाटप, प्लाझ्मादानाबाबत जागृती, असे समाजोपयोगी कार्यक्रम राबविले. गिरणगावातील शोभायात्रा मंडळाने झूम मीटिंगद्वारे नागरिकांना कोरोनाबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे गुढीपाडवा आणि नववर्ष साजरे करण्यामागील प्रथा आणि परंपरा यांचे महत्त्व पटवून दिले.

दादर येथील ज्ञानदा प्रबोधिनी संस्थेतर्फे गुढीपाडव्यानिमित्त ''कोरोनामुक्त महाराष्ट्र'' हा संकल्प करण्यात आला. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण यादिवशी व्हावे, असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. माहीम येथील लसीकरण केंद्रात दाखल झालेल्या नागरिकांचे तोंड गोड करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे प्रशांत पळ यांनी दिली.

----

कुर्ल्यात सामूहिक गुढी

कुर्ल्यातील भारत नाका परिसरात सामूहिक गुढी उभारण्यात आली. येथील परिसर भगव्या पताकांनी सजवण्यात आला होता. त्याचप्रमाणे देशभरातील विविध प्रांतांत नवीन वर्ष कशाप्रकारे साजरे केले जाते, याचा देखावा तयार करण्यात आला होता. परिसरातील नागरिकांना डिजिटल गुढी उभारण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यासाठी विशेष यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती, असे नववर्ष स्वागत यात्रा समितीतर्फे सांगण्यात आले.