लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दूरदर्शनवर गाजलेल्या ‘महाभारत’ मालिकेमधील शकुनी मामाच्या व्यक्तिरेखेत यशस्वीपणे खलनायकी रंग भरणारे अभिनेते गुफी पेंटल (७८) यांचे निधन झाले आहे. हृदय आणि किडनी संबंधित आजाराने ग्रासलेले गुफी यांच्यावर मागील १० दिवसांपासून मुंबईतील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने ते लवकरच रुग्णालयातून घरी परततील अशी शक्यता वर्तवली जात होती, पण हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा हॅरी, सून आणि नात सारा असा परिवार आहे. ओशिवरा स्मशानभूमीत गुफी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
४ ऑक्टोबर १९४४ मध्ये पंजाबमधील तरणतारणमध्ये जन्मलेल्या गुफी यांचे पूर्ण नाव सरबजीत पेंटल असे आहे. अभिनयाकडे वळण्यापूर्वी त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले होते. १९७५मध्ये रिलीज झालेल्या ‘रफू चक्कर’ या हिंदी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केलेल्या गुफी यांना बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतील शकुनी मामा या व्यक्तिरेखेने खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आणण्याचे काम केले. त्यांनी साकारलेला शकुनी मामा रसिकांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.
गाजलेले चित्रपट
- ‘रफ्फू चक्कर’नंतर ‘दिल्लगी’, ‘दावा’, ‘देस परदेस’, ‘मैदान-ए-जंग’, ‘द रिव्हेंज - गीता मेरा नाम’, ‘घूम’, ‘सम्राट ॲन्ड कंपनी’ आदी चित्रपटांमध्ये त्यांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या.
- विशेषत: ८० च्या दशकात त्यांनी केलेल्या चित्रपटांसोबतच मालिकांनीही रसिकांचे मनोरंजन केले. ‘कानून’, ‘सौदा’, ‘अकबर बिरबल’, ‘ओम नम: शिवाय’, ‘मिसेस कौशिक की पांच बहुएं’, ‘कर्ण संगिनी’, ‘भारत का वीर पुत्र महाराणा प्रताप’, ‘कर्मफल दाता शनी’, ‘राधा कृष्ण’, ‘द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण’, ‘श्श्श कोई है’ या मालिकांद्वारे ते घरोघरी पोहोचले.
- ‘जय कन्हैया लाल की’ ही त्यांची अखेरची मालिका ठरली. त्यांनी दोन मालिकांमध्ये शकुनी मामा तर तीन मालिकांमध्ये विश्वकर्माची भूमिका साकारली आहे. गुफी यांची नात सारा ‘अलिबाबा’ या मालिकेत गुलरेझ नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. पेंटल यांनी ‘श्री चैतन्य महाप्रभू’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. याची निर्मिती पवन कुमार यांनी केली होती, तर संगीत रवींद्र जैन यांनी दिले होते.