मुंबई : शिक्षक दिनानिमित्त लोकमत एज्युकेशन वेबिनार प्रस्तुत यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धात्मक परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदललेली शिक्षण पद्धती आणि परीक्षेच्या तारखांची अनिश्चितता असताना परीक्षेचा अभ्यास कसा आणि काय करावा, याबद्दल प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाचे निकाल कसेही असले तरीही स्पर्धात्मक परीक्षेबाबत सकारात्मकता ठेवून नियमित अभ्यास करावा, असे सांगितले. आत्मपरीक्षण, स्वची ओळख, आपण कोणते करिअर करू शकतो आणि निवडलेल्या क्षेत्रातील तपश्चर्या अशी त्रिसूत्री वर्षभर पाळल्यास यश नक्कीच मिळेल. तसेच केवळ स्पर्धात्मक परीक्षांवर अवलंबून न राहता पर्यायी करिअरचा मार्गदेखील तयार असावा, असे धर्माधिकारी यांनी सांगितले.आयआरएस आणि जीएसटी आयुक्त राजेश डाबरे यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये सराव आणि वेळेचे व्यवस्थापन कसे महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. ‘परीक्षा अॅप’चे व्यवस्थापक विक्रम शेखावत यांनी अॅपद्वारे मराठी भाषेत अभ्यास कसा करावा, याचे प्रात्यक्षिक दाखविले. तसेच त्यांच्या १५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या बॅचच्या तारखा जाहीर केल्या.२०२० मधील यूपीएससीचा महाराष्ट्र टॉपर मंदार पत्की आणि चैतन्य कदम यांनी एमपीएससी परीक्षेसाठी अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि काय रणनीती पाळून चांगले गुण मिळवावे, याबाबत विद्यार्थ्यांना सल्ला दिला.या चर्चेनंतर शीतल अॅकॅडमीतर्फे ‘कौन बनेगा इंग्लिश का चॅम्पियन’ ही स्पर्धा पार पडली. यामध्ये २० प्रश्न विचारून प्रत्येक प्रश्नाचे विजेते जाहीर करून त्यांना रोख बक्षीस देण्यात आले आणि एकापेक्षा जास्त उत्तर देणाºयाला २३ इंची एलईडी टीव्ही जिंकण्याची संधीदेखील मिळाली.
- हा कार्यक्रम पुन्हा http://bit.ly/LokmatEducationWebinar या लिंकवर पाहू शकता.