Join us

गाईडने वाचवले अग्रवाल कुटुंबियांचे जीव

By admin | Published: September 13, 2014 12:01 AM

स्वत:चे राहत्या घराचे छप्पर पुरात वाहून गेले होते...मुलाबाळांसह आई, पत्नी दर्ग्यात राहत असताना न खचता आपल्या पर्यटकांना सुखरूप ठेवण्यासाठी धडपड करून आमचा गाईड मोहमद यासीनने आम्हाला वाचवले.

अग्रवाल कुटुंबियांचे काश्मिरमधील थरारक अनुभवजयाज्योती पेडणेकर / मुंबई: स्वत:चे राहत्या घराचे छप्पर पुरात वाहून गेले होते...मुलाबाळांसह आई, पत्नी दर्ग्यात राहत असताना न खचता आपल्या पर्यटकांना सुखरूप ठेवण्यासाठी धडपड करून आमचा गाईड मोहमद यासीनने आम्हाला वाचवले. या गाईडच्या धाडसामुळेच काश्मीरमधून सुखरूप घरी परतू शकलो, अशा भावना बोरीवलीच्या कुमकुम अग्रवाल यांनी व्यक्त केल्या. जात-धर्माच्या सीमांपलीकडे यासीनच्या रुपात माणुसकीचे दर्शन घडले, असे सांगताना कुमकुम यांना अश्रू अनावर झाले होते. काश्मीरमध्ये आलेल्या पुरानंतर बोरीवलीचे अग्रवाल कुटुंब गेल्या चार दिवसांपासून श्रीनगरमध्ये अडकलेले होते. मात्र, धीरोदात्त अशा गाईडच्या मदतीमुळे ते दिल्लीमार्गे विमानाने मुंबईला परतले. जम्मू-काश्मिरातील पुराच्या प्रचंड मोठ्या संकटावर त्यांना गाईडकडून मिळालेल्या मदतीमुळे त्यांनी मात केली. राम अग्रवाल (७०), त्यांंची पत्नी कैलास (६५ ), पुरुषोत्तम अग्रवाल (६४), त्यांची पत्नी कुमकुम (५८), पुरु षोत्तम अग्रवाल यांची नात खुशबू मंगल (१९), नातू ईशान (१३) यांचा यात समावेश होता. बोरीवली पश्चिम देवीदास लेन येथील रामजांस अपार्टमेंटमध्ये राहणारे अग्रवाल कुटुंबिय गणपतीच्या सु˜ी निमित्ताने काश्मीरला फिरायला गेले होते. मात्र श्रीनगरहून सोनमर्गला जात असताना पूर आल्याची माहिती त्यांना सैन्यातील जवानांनी दिली. पुढचा धोका ओळखून त्यांच्या गाईडने गाडी परत गाडी हॉटेलकडे वळवली. प्रचंड वारा आणि पावसामुळे संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली होती. घरच्यांशी संपर्क कसा करायचा, या चिंतेत अग्रवाल कुटुंबिय होते. या चिंतेत तर होतो, पण सर्वांत जास्त भीती नातू ईशानची होती. अग्रवाल कुटुंबिय ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, तेथे गुडघाभर पाणी भरले होते. चारही बाजूला फक्त पाणीच पाणी दिसत होते. हॉटेलमध्ये फक्त डाळ शिल्लक होती. त्यामुळे सर्व पर्यटकांनी चार दिवस डाळभात खात कसेबसे दिवस काढले. मात्र, आमच्यापेक्षा भयानक अवस्था स्थानिकांची होती. हेलिकॉप्टरने जे जेवण मिळत होते, ते मिळवण्यासाठी त्यांची धावपळ होत होती. ते पाहून मनात वेदना होत होत्या, पुरुषोत्तम अग्रवाल सांगत होते. फोनच्या नेटवर्कसाठी मुख्यमंत्री बंगला, राजभवनाच्या गेटजवळ जाऊन उभा होतो, त्यावेळी आम्ही सुखरुप असून मिळेल, त्या विमानाने परतू असा संदेश मुलगा विकासला पाठवला होता. गुरुवारी सकाळी हॉटेलमधून विमानतळाच्या दिशेने रवाना झालो. पुरामुळे सर्व रस्ते खराब झाले होते. हॉटेल ते विमानतळ हे १५ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी आमचा गाईड मोहमद यासीनने कमालीचे कष्ट घेतले. आम्हाला विमानात बसवल्यावर आम्ही देऊ केलेले पन्नास हजार रुपये देखील त्याने नाकारल्याचे सांगताना अग्रवाल कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. एक विमान चुकल्यानंतर दुसर्‍या विमानाने दिल्लीत पोहोचल्यावर आम्ही अन्य नातेवाईकांशी संपर्क केल्यानंतर त्यांच्याही जिवात जीव आला. गुरुवारी रात्री मुंबई विमानतळावर येताच अग्रवाल व मंगल कुटुंबियांनी विमानतळावर केक कापून त्यांचे स्वागत केले. तेरा वर्षांच्या ईशानला अस्थमाचा त्रास असल्याने त्याची सगळ्यांना प्रचंड काळजी होती. पण यासिन अंकलमुळेच आम्ही सुखरुप परतल्याचे ईशानने सांगितले. ईशान आता स्थिर असून सोमवारपासून तो शाळेत जावू लागेल, असे त्याची सीमा मंगल यांनी सांगितले. ..........................(कोट)ईशान खूप घाबरला होता. त्यात आजी-आजोबाही चिंतेत होते. पण मी सकारात्मक विचार करत ईशानला धीर देत होते. त्यामुळे आम्ही व्यवस्थित घरी पोहोचू शकलो. - खुशबू मंगल .........................(कोट)पृथ्वीतळावरील सौंदर्य झेलमनदीच्या पुरामुळे नष्ट झाले आहे. काश्मिरला सौंदर्य पुन्हा बहाल होण्यासाठी खूप कालावधी लागेल. - पुरुषोत्तम अग्रवाल..........................